मुंबई समाचार : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची, तर प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने एम्पॉवरिंग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाऊंडेशनचे
सहसंस्थापक रॉनी स्क्रूवाला या कार्यक्रमात उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात स्टार्टअप्स सुरू झाले तेव्हा ४७१ स्टार्टअप्स होते, आज देशात एक लाख ५७ हजार स्टार्टअप्स झाले आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप्स क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती देण्याचे काम केले आहे.
स्टार्टअप्स विजेत्यांचा सत्कार
डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स आयटीआय गोवंडीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप्स विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
6 महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगाच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हे स्टार्टअप्स कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांनी नक्की लाभ घ्यावा.
– फाल्गुनी नायर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नायका