नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धींना मात देऊन डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर आणि अमरावती संघाने महिला व पुरुष गटात अजिंक्यपद प्राप्त केले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा पार पडली.
महिलांच्या स्पर्धेत डीसीसी नागपूर संघाने अमरावती नाईन स्टार्स संघाचा ५-४ ने पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. पुरुषांच्या सामन्यात अमरावती सीनिअर मेन्स संघाने श्री शिवाजी स्पोर्टिंग नागपूर संघाला ६-० ने पराभूत करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. १९ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात नूतन कन्या भंडारा संघाने डीसीसी संघाचा ७-४ ने पराभव करुन विजेतेपदावर नाव कोरले. १७ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात देखील नूतन कन्या भंडारा संघाने बाजी मारली. यवतमाळ संघाचा १०-० अशा मोठ्या फरकाने पराभव करुन जेतेपद पटकाविले. मुलांच्या अंतिम सामन्यात जेएनएचएस सावनेर संघाने चुरशीच्या सामन्यात नूतन भारत संघाचा ६-४ ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
१४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात नूतन कन्या भंडारा संघाने नूतन भारत चा १२-२ ने पराभव करुन विजय मिळविला. मुलांच्या सामन्यात अमरावती लिटल चॅम्प्स संघाने नूतन भारत संघाला १-० ने मात देऊन विजेतेपद प्राप्त केले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात डॉ. पीयूष आंबुलकर, सॉफ्टबॉल संघटनेचे सुरजसिंग येवतीकर, प्रवीण मानवटकर, अनिल जोशी, अमर खोंडे, केतन ठाकरे, विनय कडू आदी उपस्थित होते.