- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर/रामटेक समाचार : सुखविंदर सिंगच्‍या ‘छैया छैया’ वर थिरकले रामटेककर 

▪️ गर्दीच्‍या उच्‍चांकात रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप

नागपूर/रामटेक समाचार : सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या ‘छैया छैया’ या गीतावर रामटेककर आज पूर्ण जोमात थिरकले. ‘ताल’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘रमता जोगी’, ‘बनठण चली देखो’ या त्यांच्या सुप्रसिद्ध राजस्थानी शैलीच्या गाण्यावर तरुणाईने ठेका धरला. सुखविंदर सिंगला ऐकण्‍यासाठी रामटेक व आजुबाजुच्‍या परिसरातून आलेल्‍या रसिकांच्‍या उपस्‍थ‍ितीने आज उच्‍चांक गाठला.  

पर्यटन संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक मध्ये सलग तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव मध्ये स्‍थानिक कलावंत तसेच, राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांच्या सादरीकरणाची मेजवानी रामटेक वासियांना मिळाली. शुक्रवारी सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ ने या महोत्सवाचा शानदार समारोप झाला. कार्यक्रमाला राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, माजी खासदार कृपाल तूमाने, अभिनेते सोनू सुद यांची उपस्थिती होती.

दक्ष खंत व अमन कबीर यांचा सत्‍कार 

जगातील सर्वात युवा आयर्न मॅन म्हणून नुकताच खिताब पटकावलेला दक्ष खंतेचा यंदा रामटेकच्या महोत्सवात आशिष जयस्वाल आणि सोनू सूद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच, लेखक, कवी, नाटककार अमन कबीर यांचा देखील सत्‍कार करण्‍यात आला. रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामल देशमुख आणि अनुजा गाडगे यांनी केले.

जनतेचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ सोनू सूद

ऍड आशिष जयस्वाल यांचे मित्र अभिनेते सोनू सुद यांचे मंचावर आगमन होताच एकाच जल्लोष झाला. पंजाबमधून शिकण्यासाठी नागपुरात आलेल्या सोनुने दोघांच्या 36 वर्षे जुन्या मैत्रीची आठवण करून दिली. आशिष जयस्वाल यांच्यासोबत नागपूरच्या धरमपेठमध्ये कट्ट्यावर बसल्याच्या आणि रामटेकमध्ये एकत्र बाईकवर फिरल्याच्या आठवणी अभिनेते सोनू सूद यांनी महोत्सवाच्या मंचावरून व्यक्त केल्या. कोविड काळात गरजूंना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देणारे सोनू सुद म्हणाले, या काळात सामान्य लोकांशी जोडला गेलो. त्यांचे खूप आशीर्वाद मिळाले. तेव्हा कळले की तुम्ही जितके देता तितके अधिक तुम्हाला मिळत जाते. फिल्म मध्ये हिरो होण्यापेक्षा सामान्य जनतेचा ब्रँड ॲम्बेसेडर झाल्यामुळे अधिक आनंद आणि समाधान मिळाले, असे सोनू सुद म्हणाले. विविध सामाजिक कामांमध्ये सक्रिय असलेल्‍या सोनू सूद यांनी रामटेकरांसाठीदेखील कायम उपलब्ध असल्‍याची भावना व्‍यक्‍त केली. 

रामटेक महोत्सवासाठी कायमस्‍वरूपी तरतूद – अॅड. आशिष जयस्वाल

रामटेक मध्ये अनेकदा कालिदास महोत्सव आयोजित केले. त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला. मागील वर्षी पासून सुरू झालेल्या रामटेक महोत्सवाला देखील आपण डोक्यावर घेतले, त्याबद्दल आपला आभारी आहे, असे सांगत राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी या महोत्सवासाठी अर्थसंकल्पामध्ये कायमस्‍वरूपी तरतूद करून ठेवणार असल्‍याचे सांगितले. दरवर्षी 22 जानेवारी हा महोत्सव रामटेकमध्‍ये आयोजित केला जाणार असून शोभायात्रा जशी रामटेकची ओळख झाली आहे तसा हा पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव देखील वेगळी ओळख निर्माण करेल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *