- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : संघर्ष म्हणजे काय? ते विद्यार्थी परिषदेत शिकायला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर समाचार : येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३व्या प्रांत अधिवेशनात उदघाट्क म्हणून बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत वक्तव्य केले. संघर्ष म्हणजे काय? ते अभाविपने शिकवले असल्याचे सांगत ते म्हणाले सामान्यातल्या-सामान्य विद्यार्थ्यांमध्ये असामान्य गुण निर्माण करण्याचे कार्य विद्यार्थी परिषद करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अभाविपच्या अधिवेशनात ते मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक जुना कार्यकर्ता म्हणून बोलत असल्याचे सुद्धा वक्तव्य त्यांनी केले.

अभाविप मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विचारांच्या प्रचारासाठी झटत आहे आणि शिक्षण क्षेत्रात परिवर्तनासाठी काम करीत आहे. पण सध्या नामशेष होत चाललेल्या माओवादी विचार पुन्हा प्रचारित करण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. त्यांची वाटचाल अराजकतेकडे आहे. यासाठी त्यांनी कॉलेज कॅम्पसला साधन बनविले. या विचारांचे प्रदूषण नष्ट करून राष्ट्रवादाचे बीजारोपण करण्याची जबाबदारी आपली आहे. ती कटाक्षाने पूर्ण करा, असे आवाहन अभाविपचे पूर्व कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित प्रांत विदर्भ प्रांताचे 53 व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोलर इंडस्ट्रीचे संस्थापक सत्यनारायण नुवाल, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, विदर्भ प्रांत अध्यक्ष नितीन गुप्ता, मंत्री पायल किनाके, स्वागत समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सचिव आशिष उत्तरवार, नागपूर महानगर अध्यक्ष डॉ. अभय मुद्गल, मंत्री दुर्गा भोयर, विदर्भ प्रांताध्यक्ष श्रीकांत पर्बत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर विद्यार्थी परिषदेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आलो आहे. विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढतो आणि तो असामान्य कार्य करतो. समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती विचार करणारे विद्यार्थी घडावे, असे कार्य या संघटनेद्वारे चालते. हा संघर्ष शिकण्याची संधी विद्यार्थी परिषदेच्या विविध कार्यक्रमातून मिळते. काश्मिरात लाल चौकात तिरंगा लावण्याची मुहूर्तमेढ विद्यार्थी परिषदेने केली.

विद्यार्थी परिषद ही एकसंध समाज निर्माण करण्याचे कार्य करते. राष्ट्रीय विचाराने प्रेरित संघटनेत काम करण्याची संधी आपल्याला मिळाल्याने चारित्र्यवान नागरिक घडतो. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या अराजकतेचे वातावरण बदलवून पंतप्रधानाचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवीन शिक्षा नीतीद्वारे मूल्याधारित पिढी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादाचे बीजारोपण कसे करता येईल याचा विचार करून समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद युवांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वागतपर भाषणातून वीरेंद्र कुकरेजा यांनी, मंचावर उपस्थित मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. अभाविप ही संस्था ज्या उद्देशाने सुरू आहे त्याचे प्रेरणास्रोत डॉ. हेडगेवार आहेत. व त्याच विचारधारेतून संघटनेची आजवर वाटचाल सुरू आहे.

पायल किनाके यांनी, हे जगातील सर्वात मोठे संघटन आहे. ‘जहा जहा परिसर वहां वहां परिषद’ या तत्वावर संपूर्ण विदर्भात परिषदेचा विस्तार होत आहे. संघटनेच्या 23 जिल्ह्यात शाखा आहेत. तसेच संघटनेतर्फे विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील छात्रसंघ निवडणुका पुन्हा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी केली.

सत्यनारायण नुवाल यांनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही रा.स्व. संघाची प्रमुख शाखा आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रहीत व समर्पणाची भावना रूजविणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.

आशिष चौहान यांनी, रेशीमबाग परिसरात हे अधिवेशन रा. स्व. संघाच्या पवित्र भूमीवर होत आहे, याचा आनंद आहे. परिषद कार्यकर्त्यांचा देशभरात संघर्ष सुरू आहे. परिषदेची छात्रशक्ती राष्ट्रशक्ती व देशाचे भविष्य असल्याचे सांगितले. यासोबतच परिषदेच्या कार्यकत्यार्र्नी देशहितासाठी केलेल्या कामांची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी डिपेक्स प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन अभय मुद्गल यांनी, तर आभारप्रदर्शन आशिष उत्तरवार यांनी केले.

कार्यक्रमाला भाजपाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी खासदार अजय संचेती, माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, उद्योजक आशिष फडणवीस, अ‍ॅड. पारिजात पांडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मंदार भानुसे, संघटन मंत्री देवदत्त जोशी, पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री गितेश चव्हाण, विदर्भ संघटन मंत्री विक्रमजित कलाने, डॉ. धामणकर यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

चौकट : छात्रसंघ निवडणुकांचा विचार

गतकाळात महाविद्यालयांमध्ये छात्रसंघ निवडणुका होत. त्यातून अनेकांचे नेतृत्व उदयास आले. पण सध्या या निवडणुका बंद आहेत. त्यावर विचार करण्याची मागणी पायल किनाके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात राज्यशासन गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या घोषणेने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *