▪️ ‘अमृतकाल : विकसित भारत-2047’ परिषदेचा दुसरा दिवस
नागपूर समाचार : केंद्र शासनातर्फे घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचे ‘फाईन प्रिन्ट’ अतिशय सुव्यवस्थित आहे. यावेळी सरकारने कर कमी करण्याचा निर्णय घेतला, यातून ‘मेक इन इंडिया’ला बळ मिळणार असून भारताचा शेअरबाजार आणि विकासदर निश्चितपण वाढणार आहे, असा विश्वास मॉर्गन स्टॅनले कंपनीचे इनव्हेस्टमेंट हेड रिद्धम देसाई यांनी व्यक्त केला.
मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. तर्फे स्थानिक लक्ष्मीनगर भागातील सायंटिफिक सोसायटीच्या लॉनवर आयोजित ‘अमृतकाल विकसित भारत-2047’ या गुंतवणूकदार जागृती परिषदेच्या दुसर्या दिवशीच्या सत्रात ते गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर माजी खासदार अजय संचेती, सीटी बँकेचे माजी उपाध्यक्ष मनीष बन्सल, मनी बी इन्स्टिट्यूटचे प्रबंध संचालक आशुतोष वखरे व संचालक शिवानी दाणी-वखरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या सत्रात अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून भारतीय शेअरबाजार, विकासदर, महागाई आणि इतर संबंधित विषयावर रिद्धम देसाई यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शासनाच्या बजेटमध्ये खर्च अधिक असतो, त्यात नियमित खर्च, कॅपिटल स्पेन्डींग आणि कर्जावरील व्याज आदींचा समावेश असतो. केंद्र शासनावर कर्ज अधिक असल्याने व्याजाचा भरणा यात अधिक आहे. सध्या शासन सरकारी खर्च कमी करण्याकडे लक्ष देत आहे. मुलभूत सोयीसुविधांवरील खर्च शासनाने निश्चित केला आहे, आता त्यात वाढ होणार नसल्याने मानून यावेळी नागरिकांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यावर्षी पाणी, वीजवितरण आणि गृहनिर्माण या तीन बाबींवरच शासन अधिक खर्च व लक्ष देणार आहे.
सीटी बँकेचे माजी उपाध्यक्ष मनीष बन्सल यांनी, गुंतवणूकदार स्वत: शिक्षित असतात. पण प्रत्येक जण आर्थिक शिक्षित असतोच असे नाही. आर्थिक शिस्त शालेय व महाविद्यालयीन स्तरापासून शिकविण्याची गरज प्रतिपादिली. केवळ पैसा म्हणजे संपत्ती नव्हे तर आरोग्य, समृद्धी, देशाप्रती एकनिष्ठता, सामाजिक भान आणि आध्यात्मिक शक्ती या बाबी संपत्तीत मोडतात असेही त्यांनी सांगितले.
दीपप्रज्वलनानंतर शिवानी दाणी- वखरे आणि आशुतोष वखरे यांनी तज्ञ मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकातून आशुतोष वखरे यांनी आजच्या चर्चेच्या विषयातील बारकावे स्पष्ट केले. प्रमुख वक्त्यांच्या भाषणानंतर आशुतोश वखरे यांनी रिद्धम देसाई यांच्याशी मुलाखत रुपात संवाद साधला आणि अंदाजपत्रकातील जनहिताच्या मुद्यांवर अधिक प्रकाश टाकला. शेवटी शिवानी दाणी- वखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेअर मार्केट वाढणे आवश्यक : अजय संचेती
आजच्या चर्चेला प्रारंभ करताना माजी खासदार अजय संचेती यांनी, उद्योग क्षेत्रात वाढ व्हायची असल्यास इक्विटी मार्केट वाढण्याची गरज आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यात सातत्याने वाढ होत आहे. फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्था साकारावयाची असल्यास हे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संचेती यांनी यावेळी केले.