- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️ एम्स येथील आदिवासींच्या आरोग्यावर जागतिक परिषदेचा समारोप

▪️ पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

▪️ सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त 

▪️ आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी 

नागपूर समाचार : एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मुलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मुलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रशासनातर्फे अनेक विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू यात असे आवाहन त्यांनी केले. 

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले. 

बिलगेट्स फाउंडेशन, सनफार्मा, आयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले. 

आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी MUHS FIST-25 परिषद महत्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले. 

’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ’एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. ’एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी MUHS FIST-25 च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व ’एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे. आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25 चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *