- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला नविण्यपूर्ण उपक्रमाची जोड आवश्यक – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नागपूर समाचार : शिक्षक हा शिक्षण विभागाचा मानबिंदू तर विद्यार्थी हे दैवत आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या वाढविण्यासह त्यांच्या मनात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे मुलांची आकलन क्षमता व नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या उत्सुकतेला शिक्षकांनी नविण्यपूर्ण उपक्रमाची जोड द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सिव्हील लाईन्स येथील सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कूल येथे नागपूर विभागातील उपक्रमशिल शिक्षक या विषयावर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व प्रयोगशिल शिक्षक यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी, शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे उपस्थित होते.

परिपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया ही सामुहिक कृतीशी निगडीत आहे. सर्व विषय शिक्षकांच्या सांघीक भावनेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर दूरदृष्टी ठेऊन मुलभूत विकासाचा संकल्प केला आहे. विविध आव्हानांवर मात करीत ग्रामीण, दुर्गम भागातील शिक्षकांनी दिलेले योगदान हे मोलाचे आहे. अशा सकारात्मक योगदानातून नागपूर शिक्षण विभागाचा अपूर्व ठसा निर्माण झाल्याचे गौरोद्गार शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी काढले.

अनेक जिल्ह्यातील शाळेत विविध समस्या आहेत त्या दूर करण्याचा शासनातर्फे प्रयत्न करण्यात येईल. उत्तम शिक्षणासाठी अनुभवाच्या आधारावर शिक्षकांनी केलेले कष्ट वाया जाणार नाही याची मला खात्री आहे. शिक्षकांना मानसन्मान कसा मिळेल याकडे शिक्षण विभागाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

चर्चासत्रात नागपूर विभागातील 70 तालुक्याचे शिक्षक सहभागी झाले होते. दुर्गम, आदिवासी बहुल भागात केलेल्या कार्याचा प्रयोगशिल शिक्षकांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रत्येक जिल्हृयातील दोन आदर्श शिक्षकांनी आपले सादरीकरण सादर केले. यात एक पाऊल गुणवत्तेकडे, भौतिक सुविधा, लोकसहभागातून शालेय शिक्षणास प्रोत्साहन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माझी जिव्हाळयाची शाळा, सुरक्षित व सुयोग्य तंत्रज्ञान, विज्ञानाची जिज्ञासा, रात्र शाळा, 365 दिवस शाळा, वाढदिवस पालकांचा उपक्रम, विद्यार्थ्यांना बचतीची सवय, दत्तक शाळा, लोकसहभागातून शाळेचे सौदर्यीकरण अशाविविध उपक्रमांचा सहभाग होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *