‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. संजय देवतळे व डॉ. प्रशांत निखाडे यांचे आवाहन
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तशी नागरिकांमध्ये भीतीही वाढत आहे. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना व्यवस्था असल्यास घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचे आदेश प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. मात्र घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडे शेजा-यांचा आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन योग्य नाही. अशा काळात रुग्णांना सहकार्याची आणि मानसिक आधाराची गरज असते. मात्र अनेकांना तिरस्काराचा सामना करावा लागतो आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. योग्य वेळेत निदान झाल्यास आणि उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
त्यामुळे कोरोनाला घाबरण्यापेक्षा काळजी घेउन त्याचा सामना करा. आपल्या जवळ कुणीही पॉझिटिव्ह व्यक्ती असल्यास त्याचा तिरस्कार करू नका, त्याला आधार द्या, त्याचे मनोबल उंचावा, असे आवाहन प्रसिद्ध कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय देवतळे आणि कान, नाक, घसा तज्ज्ञ तथा व्हीएओआयचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ मध्ये बुधवारी (ता.१६) कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय देवतळे आणि कान, नाक, घसा तज्ज्ञ तथा व्हीएओआयचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी ‘कोव्हिड संवाद’ साधला. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी त्यांच्या शंकांचे निराकरण केले.
१० दिवसांपूर्वीच आपण स्वत: व संपूर्ण कुटूंब कोरोनातून बरे झाल्याचे यावेळी डॉ. संजय देवतळे यांनी सांगतानाच आपले अनुभव कथन केले. योग्य काळजी घेतल्यास कोरोना पूर्णपणे बरा होतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी १७ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक असून अँटीजेन चाचणी जर निगेटिव्ह आली तर बाहेर कुठेही न फिरता गृह विलगीकरणातच राहावे. अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्ण हा पॉझिटिव्हच असतो मात्र अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते. त्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली म्हणून बेजबाबदार वागणूक टाळा. कोणतिही लक्षणे आढळल्यास ‘गूगल’ वरून स्वत:च्या मनाने उपचार करणेही धोकादायक आहे त्यामुळे आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा मनपाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. प्रशांत निखाडे म्हणाले, कोरोना हा योग्य वेळेवर उपचाराने पूर्ण बरा होतो हे सर्वच स्तरातून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे कुणीही लक्षणे लपवू नका. संसर्गजन्य आजार असल्याने इतरांनाही त्याचा धोका अधिक आहे. प्रत्येक घरी ऑक्सिमीटर बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला. वेळोवेळी ‘ऑक्सिजन’ची पातळी तपासा. डॉक्टरांना योग्य आणि अचूक माहिती द्या.
धुम्रपानाची सवय असल्यास कोरोनाबाधिताने कटाक्षाने धुम्रपान टाळावे, असेही ते म्हणाले. कोरोनाशी लढा देताना प्रतिकारशक्ती वाढविणे अत्यावश्यक आहे. यासाठी लिंबूवर्गीय फळे, कडधान्यांचा आहारात समावेश करा. विशेष म्हणजे प्रत्येकाने ‘आरोग्य सेतू’ ॲप डाउनलोड करून ते नियमीत तपासत राहावे त्यामुळे आपल्या क्षेत्रातील कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती कळते. कोरोनाच्या या संकटात कोणत्याही संकटाकडे दुर्लक्ष करून स्वत:सह इतरांच्याही जीवाशी खेळू नका, असे आवाहनही डॉ. प्रशांत निखाडे यांनी केले.