माजी मंत्री म्हणतात, लोकांचा जीव वाचवा
नागपूर : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाराजकारण्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. कोरोनाचे संकट’वाढत असताना नागपूरमध्ये आधी मनपा आयुक्त आणि सत्ताधारी असा संघर्ष रंगला. आता परिस्थती हाताबाहेर जात असतानाही कलगीतुरा थांबण्याचे नाव नाही.
खरेतर कोरोनाने भयावह स्थिती निर्माण केली आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू आधी दिवसाला मोजले जात होते, आता प्रती तास मोजावे लागत आहेत. दर तासाला दोन रुग्ण मरत आहेत. पण अशा भयावह परिस्थितीत राज्य सरकार उपाययोजना करण्याचे सोडून जनतेला संभ्रमित करण्याचे काम करीत आहे. राज्य सरकारने किमान कोरोनाच्या विषयात तरी राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. हे असेच सुरू राहिले तर उद्या लोक रस्त्यावर मरतील, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महापौर संदीप जोशी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ जनतेला आवाहन करण्यासाठी नागपुरातील बडकस चौकात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, महापौर संदीप जोशी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला व्यापारी आणि जनतेने ९० टक्के समर्थन दिले. कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी महापौरांसह त्यांची चमू रस्त्यावर उतरली आहे. पण राज्य सरकारचे अधिकारी महापौरांच्या या प्रयत्नांना छेद देण्याचे काम करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारने मेयो आणि मेडिकलमध्ये यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोविडचा निधी दिला नाही. कोविड सेंटर्ससाठी कोणतीही मदत पाठवली नाही. एवढेच काय या विषयावर साधी बैठकही घेतलेली नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करुनही मदत पाठविली जात नाही. आज नागपुरात बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स सर्वच गोष्टींचा तुटवडा आहे. ही व्यवस्था आताही सुधारली गेली नाही, तर उद्या लोकं रस्त्यावर मरतील. याचे भानही या सरकारला नाही. सरकारने आता विदर्भातील कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी आणि लोकांचा जीव वाचवावा, अशी विनंती आम्ही सरकारला करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.