शहरात फिरून घेतला आढावा : कुटुंबाच्या आरोग्यासाठी रविवारीही शिस्त पाळण्याचे आवाहन
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने ‘जनता कर्फ्यू’चे पालन करीत भरभरून प्रतिसाद दिला. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्याची तुलना नाही. आपली नैतिक जबाबदारी ओळखून ‘जनता कर्फ्यू’ला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला मनापासून सलाम, अशा शब्दांत महापौर संदीप जोशी यांनी जनतेचे आभार मानले.
शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केल्यानंतर शनिवारी स्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण शहरात फिरून पाहणी केली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांना समजही दिली. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गर्दी दिसली तिथे शारिरीक अंतर पाळण्याचे आवाहनही केले. या पाहणी दौऱ्यात बडकस चौक परिसरात स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके उपस्थित होते.
प्रारंभी बडकस चौकात महापौरांनी भेट दिली. चौकातून जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.
यानंतर झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, सदर, जरीपटका, इंदोरा, इतवारी, पाचपावली, गांधीबाग, महाल, यशवंत स्टेडियम अशा सर्वच बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी महापौरांनी भेट देऊन पाहणी केली.
‘जनता कर्फ्यू’ म्हणजे लॉकडाऊन नाही. ही आपल्याला आपली मानसिकता बदलवण्याची संधी आहे. दोन्ही दिवस नागपूरकरांनी असाच प्रतिसाद कायम ठेवावा. काही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांच्या घरातील ज्येष्ठ आणि लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ‘जनता कर्फ्यू’नंतरही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. बाहेर जाणे खूप आवश्यक असल्यास मास्क अवश्य लावावा, सॅनिटायजरचा वापर करावा आणि महत्त्वाचे म्हणजे शारीरिक अंतर राखले जाईल याची पुरेपूर काळजी घ्यावी. शासनाच्या कोव्हिड संदर्भातील दिशानिर्देशांचे आपण सर्व मिळून पालन केल्यास आपल्या शहरात लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना विरुद्धच्या या लढाईत असेच सहकार्य करीत आपल्या सवयी बदलून घरीच राहावे, असेही आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी जनतेला केले. शहराच्या विविध भागात आमदारांनी आणि मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी नागरिकांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांकडून देखिल उत्तम प्रतिसाद मिळाला.