- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : नागपुरात का होतेय तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्या कार्यशैलीची तुलना?

नागपुरात का होतेय तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्या कार्यशैलीची तुलना?

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सोमवारी एक महिना पूर्ण झाला आहे. नागपुरात एकीकडे कोविड रुग्णांची आणि त्यामुळे होणार्‍या मृतांची संख्या वाढत असतानाच त्यांनी स्वीकारलेला कार्यभार त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते.

मात्र, एक महिन्याच्या काळात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि घेतलेल्या निर्णयांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप नेत्यांकडून वारंवार तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्यातील कार्यक्षमतेचे पोस्टर झळकाविल्या जात असून, मुंढेंपेक्षा त्यानंतर बदली घेऊन आलेले राधाकृष्णन बी. किती सरस आहेत हे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे.

नागपूर महानगर पालिकेतील तुकाराम मुंढेंचा आयुक्त पदाचा कार्यकाळ विशेष गाजला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. मात्र त्यानंतर लगेचच त्यांची बदली करण्यात आली आणि राधाकृष्ण बी यांना नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी पाठविण्यात आले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या केवळ एक महिन्याच्या काळात नागपूर शहरातील आरोग्य सोयी सुदृढ करण्यावर त्यांनी भर दिला असल्याचे वारंवार भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात गरज असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध न होणे, या तक्रारींवर त्यांनी लक्ष दिले. पूर्वी केवळ सात खासगी रुग्णालयात ३00 च्या जवळपास बेड्स होते. आता शहरातील एकूण ५३ रुग्णालये नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबरपासून हाती घेतली. नागपुरात या मोहिमेचे कामही राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात युद्धपातळीवर सुरू आहे.

मनपाद्वारे एकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामधून प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्षेत्रीय स्तरावर कोविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोविड नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *