परसोडी येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी
नागपूर : शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोव्हिड चाचणी व्हावी याकरिता मनपाद्वारे १२ फिरते कोव्हिड चाचणी केंद्र सज्ज करण्यात आले आहेत. नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणी करता यावी यासाठी मनपाची आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
बुधवारी (ता.७) लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र.३७ ‘अ’ येथील परसोडी बुद्ध विहार येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. स्थानिक नगरसेवक तथा मनपाचे शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांची चाचणी करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, संपर्क प्रमुख नितीन महाजन, नाथाभाई पटेल, अतुल गेडाम, बबनराव दियेवार, प्रभाग अध्यक्ष विवेक मेंढी आदी उपस्थित होते.
शहरातील कोव्हिड संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी चाचणी प्रक्रिया सुलभ करणे हा मनपाचा उद्देश असून यासाठी फिरते कोव्हिड केंद्र सुरू करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची सौम्य अथवा तीव्र लक्षणे असलेल्यांची त्वरीत चाचणी व्हावी व तात्काळ उपचार मिळावे यासाठी ही प्रक्रिया फायदेशीर ठरत आहे.