कोरोनाशी लढण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण – डॉ. नितीन राऊत
नागपूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासनासोबत सेवाभावी संस्थांचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे. ज्ञानदीप या संस्थेतर्फे देण्यात आलेली ऑक्सिजन मशीन तसेच व्हेंटिलेटर आदी साहित्य कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे मृत्यू व रुग्णवाढीचा दर नियंत्रणात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ज्ञानदीप संस्थेतर्फे आठ ऑक्सिजन यंत्र तसेच व्हेंटिलेटर कन्व्हर्टर यंत्र, कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनतर्फे कोविड रुग्णांसाठ नि:शुल्क दोन रुग्णवाहिका आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेले पॅन ऑक्सिजन मशीन व इलेक्ट्रॉनिक व्हेंटिलेटर कन्व्हर्टर ज्ञानदीप संस्थेतर्फे ग्रामीण, अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्था तसेच महानगरपालिका व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांचे आरोग्य केंद्र, मेळघाटातील महान या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या संस्थेत त्यासोबतच स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, मातृसेवा संघ, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर महानगरपालिका, दंदे फाऊंडेशन या संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.
कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनतर्फे कोविड रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी दोन्ही रुग्णवाहिका महापालिकेला हस्तांतरित केल्या. रुग्णवाहिका असोसिएशनतर्फे नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यानंतर सेवाभावी संस्थांना हस्तांतरित करण्यात येतील.
प्रारंभी कॉन्ट्रॅक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी कोविड रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका तसेच ज्ञानदीप संस्थेतर्फे ऑक्सिजन यंत्र व कन्व्हर्टर यंत्र आदी साहित्य ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच पालकमंत्र्यांचे त्यांनी स्वागत केले.