नागपुर : नागपुर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या वतीने शनिवारी (ता.५) स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
स्वच्छता सर्वेक्षणमध्ये नागपूरला पहिल्या दहा क्रमांकामध्ये आणण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आवाहन केले आहे. नागपुर याअगोदर ५८ व्या क्रमांकावर होते. मागील वर्षी भरारी घेत नागपूर शहराने १८ वा क्रमांक गाठला होता. या वर्षी पाहिल्या १० मध्ये आणण्यासाठी सर्व झोनचे सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि स्वछतादूत कामाला लागले आहेत.
शनिवारी सर्व स्वच्छता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढली. गांधीबाग झोनमधे पथनाट्यसुद्धा करण्यात आले.
नागरिकांना ओला-सुका कचरा वेगवेगळा देण्यासाठी आवाहन करण्यात आले. आपले नागपूर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी सज्ज झालेले आहे तरी नागरिकांनी महानगर पालिकेला सहकार्य करावे एक हेतूने जनजागृती करण्यात आली.
नागपूरला स्वच्छता सर्वेक्षण २०२१ च्या क्रमवारीमध्ये पहिल्या दहा शहरात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांची आहे. कारण फील्डवर ते काम करतात. त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नागपूर पहिल्या क्रमांकावर येऊ शकते. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे आवश्यक आहे. नागरिकांना याबददल जागृत करणे आणि वेगवेगळया डस्टबिनमध्ये कचरा ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची मनपाची जबाबदारी असल्याचे मनपा आयुक्तांनी म्हटले आहे. सगळयांच्या प्रयत्नाने आता शहराला पहिल्या दहा क्रमांकामध्ये आणायचे आहे. स्वच्छतेचे कार्य वर्षभर केल्यानंतर नागरिकांकडून सुध्दा योग्य प्रतिसाद भेटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रीन व्हिजिलचा सहभाग : नागपूर महानगरपालिकेसोबत खांद्याला खांदा लावून स्वच्छता अभियानात दरवर्षी जनजागृती करणाऱ्या ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने धरमपेठ झोन अंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतला. ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल यांनी त्यांच्या स्वयंसेवकांसोबत जनजागृती केली.