राष्ट्रीय सहसंघटनमंत्री जी.लक्ष्मण प्रमुख पाहुणे
नागपू : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यावर्षीचे 66 वे राष्ट्रीय अधिवेशन 25 व 26 डिसेंबर दरम्यान डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर रेशीमबाग येथे होणार आहे. 24 वर्षानंतर हे ऐतिहासिक अधिवेशन नागपुरात होणार आहे .या अधिवेशनाच्या पोस्टर चे विमोचन अभाविपचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री जी.लक्ष्मण यांच्या हस्ते अभाविप कार्यालयात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय छात्रा प्रमुख प्रीती नेगी, नागपूर महानगर अध्यक्ष प्रा. श्रुती जोशी, महानगर मंत्री करण खंडाळे व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना जी. लक्ष्मण यांनी, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्व प्रकारची काळजी घेउन हे अधिवेशन यशस्वीरित्या करायचे असल्याचे सांगितले. या अधिवेशनाला भारतातील सर्वच राज्यातील व केंद्र्शासित प्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी येणार आहेत. या वर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे प्रथमत:च प्रत्यक्षात सर्वात छोट्या स्वरुपात हे अधिवेशन होणार असले तरी संपूर्ण देशात जवळपास 4 हजार स्थानांवर अभासी पद्धतीने हजारो कार्यकर्ता उपस्थित राहतील.
दोन दिवस चालणार्या या अधिवेशनात वेगवेगळ्या सामाजिक व शैक्षणिक विषयांवर चर्चा होणार आहे तसेच देशातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सद्यस्थितीवर प्रस्ताव देखील मांडले जातील. हे अधिवेशन विद्यार्थी परिषदेच्या कार्याला दिशा देणारे व संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीनी महत्वपूर्ण ठरणार आहे. विमोचन सोहळ्याचे प्रास्ताविक करतांना प्रीती नेगी यांनी, यावर्षीचे अधिवेशन ऐतिहासिक होणार आहे कारण सर्वात लहान पण सर्वात मोठे असे विशिष्ठ प्रकारे होणारे हे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या संदर्भात कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत असला तरी संपूर्ण प्रकारच्या कोरोना संदर्भातील नियमांचे व अटींचे पालन कार्यकर्त्याद्वारे केल्या जात आहे.