मनपा आणि वाहतूक पोलिसांच्या बैठकीत निर्णय
नागपूर : शहरातील विविध भागात अनेक ठिकाणी जुनी भंगार वाहने अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडून असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील बेवारस वाहनांच्या या समस्येवर आता नागपूर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलिस प्रशासन संयुक्त कारवाई करणार आहे. शुक्रवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग अवाड, मनपाचे वाहतूक नियोजन अधिकारी शकील नियाजी, सहायक पोलिस आयुक्त अजयकुमार मालवीय, मनपाच्या सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी महापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके आणि इतर सर्व मान्यवरांनी शहरातील बेवारस वाहनांच्या स्थितीचा झोननिहाय आढावा घेतला. वाहतूक नियोजन अधिकारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. शहरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये ७, धरमपेठ ५२, हनुमाननगर शून्य, धंतोली ३८, नेहरूनगर शून्य, गांधीबाग २७, सतरंजीपूरा २३, लकडगंज १७, आसीनगर ९५ आणि मंगळवारी १०० असे एकूण ३५९ बेवारस वाहनांची मनपाकडे नोंद असल्याची माहिती शकील नियाजी यांनी सादर केली. हनुमाननगर आणि नेहरूनगर या दोन्ही झोनमध्ये सुद्धा बेवारस वाहनांची मोठी समस्या आहे. या संपूर्ण परिसराची लवकरात पाहणी करून तातडीने दोन्ही झोनमधील बेवारस वाहनांची माहिती सादर करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी यावेळी दिले.
वाहनांच्या विल्हेवाटीसंदर्भात धोरण तयार करा : विजय (पिंटू) झलके : शहरातील रस्ते, मैदाने, मोकळ्या जागा, फुटपाथ अशा विविध ठिकाणी अनेक बेवारस वाहने आढळतात. या वाहनांबाबत नागरिकांकडूनही अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत असतो. कारवाई करतेवेळी या वाहनांचे कुणीही मालक पुढे येत नाही. त्यामुळे या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक आहे. मनपाच्या मालकीच्या जागांवर या बेवारस वाहनांद्वारे अतिक्रमण केले जात आहे. या जागा मोकळ्या करून नागरिकांना सुविधा निर्माण व्हावी यासाठी अशा वाहनांवर पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून विल्हेवाट लावली जावी यासाठी धोरण तयार करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
‘स्क्रॅब ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ द्वारे लागणार वाहनांची विल्हेवाट : पोलिस उपायुक्त सारंग आवाड शहरातील बेवारस वाहने ही महानगरपालिकेप्रमाणेच वाहतूक पोलिस प्रशासनासाठीही समस्या आहे. याबाबत प्रशासनातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील बेवारस वाहने शोधून त्यांच्या मालकांना नोटीस बजावण्यात येत आहेत. यामधून ज्या वाहनांबाबत कुणीही पुढे येउन कार्यवाही करणार नाही अशा वाहनांची विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी ‘स्क्रॅब ट्रेडिंग कॉर्पोरेशन’द्वारे कार्य केले जाणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यामध्ये संयुक्तरित्या कारवाई करून शहरातील बेवारस वाहनांची समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक पाऊल आहे, असे मत नागपूर शहर वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग अवाड यांनी व्यक्त केले.
कारवाईमुळे समाजात सकारात्मक संदेश : दयाशंकर तिवारी : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त कामगिरी ही सकारात्मक बाब आहे. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून या वाहनांच्या आजुबाजुला आणि खाली कचरा जमा आहे. तो कचराही साफ होउ शकेल. तसेच रात्रीच्या वेळी ही बेवारस वाहने असामाजिक तत्वांसाठी अड्डा ठरत असतात. या कारवाईमुळे असामाजिक तत्वांवरही आवर बसून समाजात सकारात्मक संदेश जाईल, असा आशावाद ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.