नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१५ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २३९४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,०३,३०,५००/- चा दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ झोन अंतर्गत ३०, हनुमाननगर झोन अंतर्गत ८ धंतोली झोन अंतर्गत ११, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत १५, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १८४७३ बेजबाबदार नागरिकांकडून रु ९२ लक्ष ३६ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.