नागपूर : कोव्हिड-१९ च्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी शहरातील संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
बैठकीत पुढे बोलताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, कोव्हिडच्या काळात आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे लसीकरणाचा आहे. ही जबाबदारीही त्यांनाच पार पाडायची आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्हीचा डाटा बेस तातडीने तयार करावा. झोननिहाय खासगी रुग्णालयांकडूनही तातडीने माहिती मागवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. लसीकरणासाठी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती, त्याची चाचपणी, आवश्यक असलेल्या सोयी, आवश्यक असलेली कोल्ड चेन याबाबतचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान यांनी कोव्हिड लसीकरणासंदर्भातील तयारी कशी असावी याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. लसीकरण केंद्र कसे असावे, तेथे काय काय सोयी असाव्यात, तेथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यायची, लसीकरण मोहिमेत कुठल्या विभागाची काय भूमिका राहील, आदींबाबत माहिती दिली. व्हिडिओच्या माध्यमातून विस्तत मार्गदर्शन केले. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल. पहिले प्रशिक्षण १९ डिसेंबर रोजी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनीही मनपाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. लाभार्थ्याची माहिती जमा करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘कोव्हीन’ अँप बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.