नागपूर : ज्या उद्योगाची परिसरात आवश्यकता त्याच्या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. औद्योगिक विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. उद्योजकांची ही गरज ओळखून बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनने बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणामुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केला. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत संस्थेच्या सभागृहात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
रिफॅक्टरीज हे पहिले प्रशिक्षणाचे सत्र पूर्ण झाले असून वेल्डींग प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या गावी जावून या प्रशिक्षणाचे महत्व तेथील मुलांना समजावून प्रोत्साहित करावे. त्यामुळे प्रशिक्षित कामगार उद्योग क्षेत्राला मिळण्यास सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. हे प्रशिक्षण महत्वाचे असून प्रशिक्षणार्थींना निश्चितच लाभ होईल.
प्रशिक्षण आयोजनासाठी येणाऱ्या अडचणी दूर करुन चांगले प्रशिक्षण कसे देता येईल यावर भर द्यावा. प्रशिक्षण इमारतीच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मुलांना या प्रशिक्षणात जास्तीत जास्त सहभागी कसे करता येईल, यावर भर द्या. कोरोना विषाणू संसर्गामुळे या कामास उशीर लागला आहे. आता प्रादुर्भाव कमी होत असल्याने त्यास गती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रशिक्षणाचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला असून पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रमाणपत्र देतांना आनंद होत आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी फायदा घेवून कार्यक्षम व कौशल्यक्षम व्हावे, त्यामुळे मनुष्यबळ निर्मितीत वाढ होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. असेच प्रशिक्षण इतर जिल्ह्यातही व्हावे, असे त्यांनी सांगितले.