नागपूर : शहर कॉंग्रेसचे महासचिव आणि प्रवक्ते संदेश सिंगलकर यांच्या कारवर मद्यधुंद अवस्थेतील पाच मुला-मुलींनी दगडफेक करून कारची काच फोडली. ही घटना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. काच फोडणारे पाचही जण काल रात्री उशिरा पार्टी करून आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या मुलामुलींचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सिंगलकर यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सिंगलकर राहत असलेल्या धरमपेठ खरे टाऊन येथे लाड अपार्टमेंटपुढे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संदेश सिंगलकर यांनी त्यांची एमएच ३१-डीव्ही १८८६ क्रमांकाची इनोव्हा कार बुधवारी सायंकाळी आदित्य हॉटेलच्या बाजूला उभी केली होती. काल, रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास दोन मुली व तीन मुलांनी कारवर दगडफेक केली अन् पळ काढला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाल्याचे संदेश सिंगलकर यांनी सांगितले. याप्रकरणी सिताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धरमपेठेत तरुणांचा उन्माद नेहमीच दिसून येतो. या भागात मुले, मुली नेहमीच हैदोस घालत असतात. हैदोस घालणाऱ्यांमध्ये उच्चभ्रू तरुण-तरुणी असल्याचेही बरेचदा पुढे आले आहे.