‘इंस्टालेशन’ची वाट पाहणा-या ऑक्सीजन प्लान्टचे इमावाड्यातील ‘आयसोलेशन’मध्ये लवकरच क्रियान्वयन
महापौरांचा पुढाकार : पाचपावली सुतिकागृहातील प्लान्टचे रविवारपर्यंत लोकार्पण
नागपूर समाचार : कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महापौर दयाशंकर तिवारी नवे ऑक्सीजन प्लान्ट तातडीने उभारण्यासाठी प्रयत्नरत आहेत. एम.आय.डी.सी. परिसरातील इंस्टालेशनची वाट पाहणा-या नवीन असलेल्या ऑक्सीजन प्लान्टला इमावाड्यातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थापित करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले. यामुळे आता ५० बेडला ऑक्सीजनचा पुरवठा होणार आहे.
एम.आय.डी.सी.तील वॉटर ट्रीटमेंट प्लान्टच्या बाजूला १३ के.एल.चा ऑक्सीजन प्लान्ट असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांना प्राप्त झाली. त्यांनी तातडीने या प्लान्टला भेट दिली. संपूर्ण माहिती घेतली. हवेने ऑक्सीजन तयार करणारा हा प्लान्ट कोव्हिड परिस्थितीत रुग्णालयात हलविला तर त्याचा उपयोग गरजू रुग्णांना होईल. हे लक्षात घेऊन महापौरांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना याबाबत माहिती दिली.
आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले. आता हा प्लान्ट इमामवाड्यातील मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आला आहे. ज्याचे इंस्टालेशन लॉयन्स क्लब स्वखर्चाने करेल, असे लॉयन्सचे विनोद वर्मा यांनी सांगितले. सध्या ‘आयसोलेशन’मध्ये ३६ बेड असून लवकरच १४ बेडची नव्याने व्यवस्था करण्यात येत आहे. अशा एकूण ५० बेडला या प्लान्टच्या माध्यमातून ऑक्सीजन मिळेल. त्यामुळे येथे वापरण्यात येणारे गॅस सिलिंडर इतरत्र उपयोगात येऊ शकतील, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
रविवारपर्यंत पाचपावली प्लान्टचे लोकार्पण : पाचपावली सुतिकागृह आणि के.टी. नगर येथे मनपाचे कोव्हिड हॉस्पिटल तयार आहे. डॉक्टरांची नियुक्तीही झाली आहे. फक्त ऑक्सीजनअभावी ते सुरु करण्यात आले नाही. पाचपावली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीड मधून गॅस मध्ये परावर्तित करणाऱ्या ऑक्सीजन प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून ११० बेड करिता येत्या रविवारपर्यंत प्लांटचे लोकार्पण करण्यात येईल.
गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने ११५ बेड आणि १६ आयसीयूसाठी हवेतून ऑक्सीजन तयार करण्याचा प्लान्ट उभारण्यात येत आहे. १५ दिवसानंतर त्याचेही काम सुरू होईल. ऑक्सीजन पुरवठ्याच्या दृष्टीने मनपाचे रुग्णालय स्वयंपूर्ण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.