दिलासादायक बातमी! भारतातील रिकव्हरी रेट युरोप-अमेरिकेपेक्षा चांगला
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारं लढाई देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगानं होत आहे, पण त्याचबरोबर रिकव्हरी रेट देखील वाढला आहे, असा दावा मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी यांनी केला आहे.
१४ ते २१ दिवस खबरदारीची आवश्यकता
डॉ. जोशी म्हणाले की, दुसरी लाट खूप वेगानं आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी करोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोकं घाबरलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. विषाणू येत जात राहतो. व्हायरस म्यूटेशन ही गंभीर समस्या असली तरी यामुळे घाबरण्याची गरज नाही. आपण जसं कपडे बदलतो तसंच व्हायरस त्याचा रंग बदलतो. त्याला कंट्रोल केलं जाऊ शकतं आपण सतर्क राहण्याची गरज असून १४ ते २१ दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचे तीन प्रकार
कोरोनाचा उपचार लोक खूप उशिराने सुरू करतात. आजार अंगावर काढतात. त्याचबरोबर मोबाईलवर येणाऱ्या माहितीवर लोक विश्वास ठेवतात. लोकांनी सरकारच्या सूचनांचं पालन केलं, तर कठिण परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत नाही. कोरोनावर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. हलका, मध्यम आणि तीव्र कोरोनो. हलका स्वरूपातील लक्षणं असलेल्यांनी ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मध्यम व तीव्र कोरोना असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे.
दरम्यान, भारताची रिकव्हरी रेट अनेक मोठ्या देशांपेक्षा चांगला आहे. युरोप-अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशातील मेडिकल प्रोटोकॉलमुळे रुग्ण लवकर बरे होत आहेत. त्याचबरोबर लोक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचा वापर योग्य पद्धतीनं करत असल्याचा दावाही डॉ. जोशींनी केला आहे.