चंद्रपूर महानगरपालिका बालकांना मोफत लस देणार
चंद्रपूर, ता.१३ : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून १३ जुलै रोजी रामनगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पीव्हीसी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. विशेष म्हणजे मनपाद्वारे बालकांना ही लस नि:शुल्क देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबुताई वैरागडे, नगरसेवक देवानंद वाढई, उपायुक्त विशाल वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गलहोत, लसीकरण अधिकारी संदीप गेडाम, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत यांची उपस्थिती होती
एक वर्षाच्या आतील बालकांना निमोनिया, मेनेटांयटीस, बॅक्टेरीमिया, सेपसीस, ओटायटीस आणि सायनुसायटीस आजारापासून ही लस संरक्षण देईल. न्युमोकोकल/निमोनिया हा फुफ्फुसांना होणारा संसर्ग आहे. ज्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते आणी ताप व खोकला येतो. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मृत्यु सुध्दा होऊ शकतो असे तज्ञ सांगतात. यावर उपाय म्हणून देण्यात येणारी निमोनियापासून लहान बाळांच्या संरक्षणासाठी त्यांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
गंभीर न्युमोकॉकल आजार : होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. या लसीमुळे गंभीर न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण तर होईलच सोबत समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकॉकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीचा पहिला डोस दीड महिना पहिला पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिस-या पेंटासोबत व तिसरा बुस्टर डोस 9 महिन्यात एम. आर. सोबत देण्यात येईल.
न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?
न्युमोकॉकल आजार म्हणजे Streptococcus Pneumoniae या बॅक्टेरीयामुळे होणारा आजार आहे. StreptococcusPneumoniae हा बॅक्टेरीया 5 वर्षाच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.
आजाराची लक्षणे :
ह्या आजाराची मुख्य लक्षणे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.