NBP NEWS 24,
26 JULY 2021.
नागपूर : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २६ मधील वाठोडा येथील कामाक्षी नगर आणि अनमोल नगर शिवाजी पार्क येथे अमृत योजने अंतर्गत मनपाद्वारे जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे. प्रभाग २६ मधील कामाक्षी नगर आणि अनमोल नगर हे दोन्ही परिसर घनदाट वस्तीचे असून येथील रस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे नागरिकांना पुढे होणारा त्रास लक्षात घेता हे दोन्ही जलकुंभ पर्यायी जागेवर बांधण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळाने महापौर दयाशंकर तिवारी यांना केली. स्थानिक जनतेने दोन्ही जलकुंभासाठी पर्यायी जागा सुचविताना मनपाच्या ठरावाच्या विरोध दर्शविला.
शिष्टमंडळात ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह नगरसेविका मनीषा कोठे, नगरसेविका समिता चकोले, अनमोल नगर येथील रहिवासी उमेश उतकेडे, पप्पू तितरमारे, कामाक्षी सोसायटीमधील साधना ठोंबरे, विनोद निनावे, शंकरराव ढोबळे, श्री. दर्वे आदी उपस्थित होते.
२२ जुलै रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदर जलकुंभाचा विषय सभागृहाच्या पटलावर आल्यानंतर नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी त्याचा विरोध केला. त्यांनतर स्थानिक रहिवाशांनी ऍड. मेश्राम यांची भेट घेत महापौरांना निवेदन दिले. यात त्यांनी नमूद केले की, कामाक्षी नगर हा परिसर घनदाट वस्तीचा आहे, येथील रस्ते सुद्धा अत्यंत अरुंद आहेत. अशा ठिकाणी जलकुंभाचे निर्माण करण्याऐवजी कामाक्षी नगरालगत मनपाची क्रीडा संकुलाकरिता राखीव आठ एकर जागा आहे, या जागेत हे जलकुंभ बांधण्यात यावे. यासोबतच अनमोल नगर शिवाजी पार्क येथील जलकुंभाचे निर्माण मैदानात प्रस्तावित आहे. मात्र या मैदानासंदर्भात न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. शिवाय येथील रस्ते सुद्धा अरुंद असून परिसरात सिवर लाईनचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे हे जलकुंभ सिम्बॉयसिसलगत असलेल्या मनपाच्या जागेमध्ये बांधण्यात यावे, अशी मागणी केली.
२२ जुलै ला सभागृहात स्थानिक नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पटलावर आलेल्या या विषयाला विरोध दर्शवून उपरोक्त सर्व शक्यता मांडल्या. यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यास संमती देऊन जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचे पुनर्निरीक्षण करण्याचे निर्देश देत विषय स्थगित ठेवला.
Post Views: 3,397