बजेरिया येथील नवीन रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन ; पाच कोटीच्या निधीतून तयार होणार रस्ता
नागपूर समाचार, ता. १६ : मध्य नागपुरात काही जुन्या वस्त्या आहेत ज्या ठिकाणी रस्ते, बगीचे नाहीत. अशा ठिकाणी बदल करणे कठीण आहे. परंतू नागपूर महानगरपालिका व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नांनी मध्य नागपुरातल्या बजेरिया परिसरात मोठा रास्ता होत आहे तसेच वंदे मातरम उद्यानाची निर्मिती सुद्धा केली जात आहे. मनपाने या भूमिपूजनाच्या माध्यमातून आधुनिक परंपरेला सुरुवात केली. यामुळे बजेरिया परिसराला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल आणि इथल्या विकासाला नवीन दिशा मिळेल, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग क्र. १९ मधील इम्प्रेस मॉल समोरील बजेरिया येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या विशेष प्रयत्नातून पाच कोटी रुपयाच्या निधीमधून निर्माण होत असणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (ता.१६) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य व समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, आरोग्य समिती सभापती संजय महाजन, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रभाग १९ च्या नगरसेविका संजय बालपांडे, सरला नायक, विद्या कान्हेरे, माजी महापौर अर्चना डेहनकर, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, गांधीबाग झोनचे कार्यकारी अभियंता धनंजय मेंढूलकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाने आपल्या विकास कार्याला मिशनमध्ये रूपांतरित केल्यास ते काम लवकर पूर्ण होते. महापौर दयाशंकर तिवारी हे अशाच वृत्तीचे आहेत. त्यांची काम करण्याची शैली वेगळी आहे, त्यांनी ठरविलेले काम पूर्ण होइपर्यंत ते स्वस्थ बसत नाही. या रस्त्यासाठी त्यांचे २००४ पासून प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नाचे फलित आज भूमिपूजनाच्या कार्यातून मिळाले आहे. कोरोना काळातही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. मनपाच्या कामातून मनपाची प्रतिमा नागरिकांच्या मनात सकारात्मक बनविली. यापुढेही नागपूर शहराचा विकास असाच होत राहिल यात काही शंका नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांचे कौतुक केले.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळतर्फे नागपूर महानगरपालिकेला गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग क्र. १९ येथे रस्त्याच्या बांधकासाठी देण्यात आलेल्या जागेवर प्रल्हादराय अग्रवाल मार्ग ते रजवाडा पॅलेस पर्यंत रस्त्याचे बांधकाम होणार आहे. रस्त्यासाठी निधी सुद्धा महामंडळ तर्फे देण्यात आली आहे.
१६४ कुटुंबाना रस्त्यावर येण्यापासून वाचविले : महापौर दयाशंकर तिवारी
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरिया परिसरातील या रस्त्याच्या निर्मितीमुळे १६४ कुटुंबाची घरे तुटण्यापासून वाचली. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून फेब्रुवारी २०२२ मध्ये या रस्त्याचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या रस्त्यामुळे इम्प्रेस मॉल जवळ होणारी गर्दी ट्राफिक कमी होईल, नागरिकांना रेल्वे स्टेशनवर लवकर पोहचण्यास मदत होईल, तसेच बजेरिया परिसरातील जागेच्या किमती वाढतील, असेही महापौर दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, बजेरिया वस्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या परिसरात १ लाख २२ हजार वर्ग मीटर जागेवर ‘वंदे मातरम उद्यान’ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मोठ्या बगीच्याची निर्मिती करण्यात येणार आहे. या बगीच्याचे भूमीपूजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी दिली. यामध्ये १ कोटी ९८ लाख रुपयांचे सिव्हिल वर्क, ५० लाख रुपयांचे होर्टीकल्चर वर्क, जवळजवळ ५० लाख रुपयांचे म्युरल असणार आहे. हा बगीचा शाहिद झालेल्या जवान ज्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित वीरांना समर्पित आहे. बगीचात ज्या ठिकाणी जवान शहीद झाले तेथील बॅकग्राऊंड आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती राहील. तसेच येथे दोन लढाऊ विमान, एक टॅंक, सैनिकांची एक नाव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली.
आमदार विकास कुंभारे यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन ब्रिजभूषण शुक्ला यांनी केले. आभार अजय गौर यांनी मानले.