महापौरांच्या हस्ते मनपात ज्येष्ठ नागरिक कक्षाचे लोकार्पण
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेमध्ये येणा-या ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेउन त्यांच्या सुविधेसाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टच्या सहकार्याने मनपा मुख्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरू करण्यात आले आहे. महापौर कार्यालयामध्ये स्थित ज्येष्ठ नागरिक कक्षाचे मंगळवारी (ता.२६) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष मनोहर खर्चे, उपाध्यक्ष वसंत पाटील, सहसचिव वासुदेव वाकोडीकर, कोषाध्यक्ष मनोहर तुपकरी, कार्यकारी सदस्य भगवान टिचकुले, प्रमिला राउत, माधुरी भुजाडे, गीता महाकाळकर, पंढरीनाथ सालीगुंजेवार, अधीर बागडे, वसंतराव भगत, देवराव सवाईथुल, वनमाला मुनघाटे, हेल्पेज इंडियाचे सुनील ठाकुर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर प्रवेश आणि करिअरसंबंधी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने मनपा मुख्यालयात विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत असून मनपामध्ये कामासाठी येणा-या शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा निर्माण व्हावी याउद्देशाने येथे ज्येष्ठ नागरिक कक्ष असावी अशी संकल्पना पुढे आली. यासंबंधी सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टच्या पदाधिका-यांशी चर्चा करून त्यास अंतिम रूप देण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
दर मंगळवारी व गुरूवारी हे केंद्र दुपारी १२ ते २ वाजतादरम्यान सुरू राहिल. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना दिलासा मिळवून देण्याचे कार्य ज्येष्ठ नागरिक केंद्रामार्फत होईल. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी या कक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेचा एक पदाधिकारी सेवारत असणार आहे. यासाठी आवश्यक सहकार्य महापौर कार्यालयामार्फत केले जाईल. ‘आझादी-७५’च्या अनुषंगाने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना सुविधा मिळवून देण्याचा नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. याच श्रृंखलेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अंतर्भूत करण्यात आले असून मनपातील या केंद्रामुळे शहरतील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमास सहकार्य करणा-यांना सन्मानपत्र प्रदान : १ ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने कवेवर्य सुरेश भट सभागृहामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले. या कार्याच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी सहकार्य करणा-या मनपातील पदाधिकारी व अधिका-यांना यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरवान्वित करण्यात आले. महापौरांचे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, स्वीय सहायक संजय मेंढुले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. रेणूका यावलकर, स्वाती गुप्ता, विद्या पाझारे, शीतल गोविंदलवार, अजय ओजवानी, निधी कडवे, राजेश तिजारे, अधीर बागडे, भगवान टिचकुले, रामदास सेलोकर, महादेवराव अंजनकर, अनिल लोणारे, केशवराव सुलकर, मनोज तांबुलकर, सुनील ठाकुर, नामदेवराव आमले, वसंत भगत, नरेंद्र थोपटे, श्रीराम बांदे आदींना महापौर दयाशंकर तिवारी यांनी सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित केले.