- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपातर्फे शहरातील बाजारपेठांमध्ये रात्री स्वच्छता कार्य

मनपा आयुक्तांचा महत्वपूर्ण पुढाकार

नागपूर समाचार : नागपूर शहरातील बाजारपेठांमध्ये रात्री स्वच्छता कार्य करण्याचा महत्वपूर्ण पुढाकार नागपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपूर शहरातील प्रमुख बाजारपेठा जसे – सीताबर्डी, गांधीबाग, कॉटन मार्केट, धरमपेठ, सदर, खामला, कोतवाली बाजार, महाल बाजार, शिवाजी पुतळा, सक्करदरा आणि अन्य बाजारपेठांमध्ये रात्री दुकाने बंद झाल्यानंतर मनपाद्वारे स्वच्छता केली जात आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार स्वच्छता विभागाद्वारे करण्यात येत असलेल्या या कार्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभराच्या रेलचेलीनंतर रात्री दुकान बंद करताना दुकानांच्या कर्मचाऱ्यांद्वारे सफाई करून कचरा दुकानाबाहेर कचरा टाकला जातो. सकाळी फिरायला निघणाऱ्या नागरिकांना या कचऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्तांनी दुकाने बंद झाल्यानंतर बाजारपेठेत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वछता करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा मोठा अभियान सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार स्वच्छतेमध्ये रँकिंग सुधारण्यासाठी मनपा आरोग्य विभाग अहोरात्र मेहनत घेत आहे.

दिवसा बाजारपेठेमध्ये असणारी गर्दी, वाहतूक व अन्य कारणांमुळे स्वच्छता करणे अवघड जाते त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वच्छता कार्य सहजरित्या करता येत असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. मनपातर्फे रात्रीच्या वेळी स्वच्छतेचा घेण्यात आलेला निर्णय हा उत्तम असून यामुळे दिवसा स्वछता करताना मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.

१५ डिसेंबरपासून विलगीकृतच कचरा स्वीकारणार : कचरा संकलन आणि व्यवस्थापनांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. घरोघरी जाउन कचरा संकलीत करणाऱ्या कचरा गाड्यांमध्ये १५ डिसेंबरपासून फक्त विलगीकृत कचराच स्वीकारण्यात येणार आहे. ओला आणि सुका असा वेगवेगळा विलग न केलेला कचरा घंटागाडीमध्ये स्वीकारला जाणार नाही. याबाबत मनपा आयुक्तांनी ए.जी. एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. कंपनीच्या व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, घरातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेळ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घरातून कचरा गोळा केल्यानंतर ट्रान्सफर स्टेशनला आणला जातो. तेथे मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये तो टाकला जातो. तेथे सुद्धा ओला आणि सुका कचरा वेगवेळ्या ठेवला जातो. भांडेवाडी येथे सुका कचरा वेगळा ठेवला जातो आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून जैविक खत तयार करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *