प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानांवर मनपाची कारवाई
नागपूर समाचार : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.
गुरुवारी (ता.६) धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाद्वारे कॉटन मार्केट येथील जय दुर्गा ट्रेडर्स दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत नंगापुतला चौक ईतवारी येथील भुषण प्रिटींग दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
तसेच ईतवारी बाजार येथील लोकल प्लास्टीक सप्लायर दुकानावर कारवाई करुन ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. उपद्रव शोध पथकाने गुरुवारी १२ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत लकी जनरल स्टोअर्स हिंगणा येथून १००० प्लास्टिक पतंग जप्त केल्या व ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५१ पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.