प्लास्टिक पतंग विरोधात उपद्रव शोध पथकाची मोठी कारवाई, ८,१०० पतंग जप्त
नागपूर समाचार : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पाचपावली पोलिसांच्या सहकार्याने प्लास्टिक पतंग विरोधात मोठी कारवाई करीत शुक्रवारी (ता. ७) रात्री बंगाली पंजाब रेल्वे क्रॉसिंगच्या मागे ८,१०० पतंग जप्त करून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. जप्त केलेल्या पतंगांची अंदाजे किंमत ८७,१५० रुपये एवढी आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली. प्लास्टिक पतंग विरोधातली मनपाची ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत आशीनगर झोनमध्ये येत असलेल्या बंगाली पंजाब रेल्वे क्रॉसिंगच्या मागे मोहम्मद खान यांचे घरी प्रतिबंधित प्लास्टिक पतंगीचा अवैध साठा असल्याचे गुप्तबातमीदारांमार्फत माहिती होताच मनपाच्या उपद्रव शोध पथकाने पाचपावली पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.
आशीनगर झोन उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री. सोनोने व त्यांच्या चमूने मोहम्मद खान यांचे घरून अंदाजे ८७,१५० रुपये किमतीचे ८,१०० नग प्लास्टिक पतंग जप्त केले. मोहम्मद खान यांचे हे कृत्य दुसऱ्यांदा असल्यामुळे त्यास महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्या अधिनियम २००६ व महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा अधिनियम २००६ अन्वये १० हजार रुपये दंड थोटावला. तसेच जप्त प्लास्टिक पतंगांचा मुद्देमाल पुढील कारवाई करिता मनपाच्या आशीनगर झोन येथे नेण्यात आला.