नाना पटोलेंच्या नागपूर येथील निवासस्थानावरील सुरक्षा वाढवली
नागपूर समाचार, १८ जानेवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राहटे कॉलनी परिसरातील केशव कला या इमारतीत नाना पटोले यांचा फ्लॅट आहे. या इमारतीसमोर सकाळपासूनच नागपूर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाचे राखीव कुमक दाखल झाले असून यामध्ये १४ पोलीस जवान आणि एक अधिकाऱ्याचा समावेश आहे.
नाना पटोले सध्या नागपुरात नाही. नागपुरात आल्यानंतर तैनात असलेल्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती पोलीस विभागाकडून दिली जात आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सकाळपासूनच कोराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करत पदाधिकाऱ्यांसोबत बसून घोषणाबाजी सुरू केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे.
केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर का गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असाही सवाल बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला. नाना पटोले यांच्या “मै मोदी को मार सकता हू” या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण आता तापलेले आहे. भाजपच्या वतीने ठिक ठिकाणी आंदोलने, निदर्शने सुरू केली जात आहेत. यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.