जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर समाचार : जिल्हा माहिती कार्यालय नागपूरद्वारे अनुसूचित जातींच्या योजनांवरील चित्ररथाला जिल्हाधिकारी आर.विमला यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. या चित्ररथामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कोरोना विषयक जनजागृती संदेश दिला जात आहे. तसेच सामाजिक न्याय व समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रसिद्धी महानगर व जिल्ह्यात करण्यात येत आहे. या चित्ररथासोबत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या समाजकल्याणाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे वितरण केले जाणार आहे.
यामध्ये रमाई आवास (घरकुल) योजना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकारण व स्वाभिमान योजना, गठई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल वाटप, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य, कन्यादान योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना आणि भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना या योजनांची माहिती वितरीत केली जात आहे.
जिल्हाधिकारी आर.विमला यांनी यावेळी चित्ररथाच्या विषयाला व वितरण व्यवस्थेला जाणून घेतले. ग्रामीण व शहरी भागातील गरजू व्यक्तीपर्यंत योजनांची माहिती पोहचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.