५० हजार तरुणी मातेसमवेत धावणार,विभागीय आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात फक्त महिलांसाठी मॅराथॉन स्पर्धा, पालकमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा
नागपूर समाचार : ‘भेदभाव सोडा ‘, ‘चला समानतेसाठी धावूया ‘, व ‘सुरक्षेसाठी धावूया ‘असा संदेश घेऊन नागपूर महानगरातील तरुणी आपल्या मातेसह 13 मार्चला महाजागार करणार आहेत. संविधान चौक ते कस्तुरचंद पार्क अशी पाच किलोमीटर अंतराची ही फक्त महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा महानगरातील 50 हजारावर मुली मातांसह होणार आहे. प्रशासनाच्या आठ मार्चच्या महिला दिनाच्या हा विस्तारीत उपक्रम असणार आहे.
जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात व आढावा घेतला. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या नेतृत्वात महिला शक्तीचा महाजागर 13 तारखेला नागपुरात होईल. यावेळी तमाम नारीशक्तीच्या पालक भूमिकेत आम्ही उभे राहू,असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, जिल्हाधिकारी आर. विमला या महिला आधिकारी महत्त्वपूर्ण पदांवर सक्षमपणे काम करीत आहे. हे नागपूरसाठी भूषण असून या राज्यात महानगरात मुली सुरक्षित आहेत. ही आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे अशी ,भावना प्रत्येकाच्या मनामनात रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ही मॅरेथॉन स्पर्धा संविधान चौकातून आरंभ करून विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना व्हीसीए चौक या ५ किलोमीटरच्या मार्गाने होईल. स्पर्धेचा समारोप संविधान चौकात होईल. सहभागासाठी जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच लिंक जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन सर्वांना यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे.
मॅरेथॉनमध्ये सामील होणाऱ्या विद्यार्थींनीना त्यांच्या शाळेतून स्कुलबसने आणून सुरक्षितपणे घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्याची सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कस्तुरचंद पार्क मैदानात करा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केवळ महिलांसाठी होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, स्पर्धेच्या मार्गावर चोख बंदोबस्त करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश वाहतूक पोलीस उपायुक्तांना दिले. स्पर्धकांच्या स्वागतासाठी संविधान चौक, जिमखान्यासमोर पोलीस बॅंड, एसआरपी व आर्मी बॅंड, शाळांचे ब्रँड पथक लावण्याची सूचना त्यांनी केली.
‘ब्रेक द बायस ‘ , ‘रन फॉर इक्वॅलिटी ‘ तसेच वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीट बेल्ट व हेल्मेट वापरा, स्पीडवर नियंत्रण ठेवा या संदेशासह ‘रन फॉर सेफ्टी ‘ वर आधारित फक्त महिलांसाठी ही स्पर्धा असेल. सकाळी सात ते आठ या कालावधीमध्ये हे आयोजन असेल. जिल्हा प्रशासनामार्फत या संदर्भातील लिंक लवकरच जाहीर होईल त्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. मॅरेथॉन स्पर्धेत शाळेमधील ८, ९ व ११ व्या वर्गातील फक्त मुली व त्यांच्या माता सहभागी होतील, तसेच महाविद्यालयीन तरुणींना देखील यामध्ये सहभागी होता येईल ,अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली.