कचऱ्यात आढळलेले अर्भक जवळच्याच पुरोहित नर्सिंग होमचे, ६ वर्ष जुने असल्याचा दावा, तपास सुरु
नागपूर समाचार : नागपूरच्या क्वेटा कॉलोनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक मिळाल्यानं खळबळ उडाली होती. पोलीस तपासात हे अर्भक जवळच्याच पुरोहित नर्सिंग होमचे असल्याचं पुढं आलंय. हे अर्भक सहा वर्षे जुने आहे. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. यशोदा पुरोहित यांनी एका हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सहा अर्भक आणले होते. ते अर्भक त्यांनी नर्सिंग होममध्ये सुरक्षित ठेवले होते. मात्र, 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी नर्सिंग होमच्या पुनर्निर्मितीस सुरुवात झाली. त्यामुळं डॉ. गोकुळ पुरोहित यांनी केअरटेकर बिपीन शाहू याला जुने साहित्य विकून टाकण्यास सांगितले. भंगारवाल्याला हे साहित्य विकून टाकण्यात आले. मात्र, भंगारवाल्याने भंगारासह बायोमेडिकल वेस्ट आणि अर्भक ही घेतले.
अर्भक आपल्या कामाचे नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झालाय. काचेच्या बरणीत असलेले हे अर्भक नंतर एक कचरा विकणाऱ्या व्यक्तीने काचेची बरणी घेऊन हे अर्भक तसेच टाकून दिले. मात्र, उत्तरीय तपासणीनंतर सत्यता बाहेर येईल, असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी व्यक्त केलंय.
न्यायवैद्यक अहवालानंतर अर्भक किती जुने आहेत याचा शोध घेण्यात येईल. अर्भक ठेवण्याची किंवा त्याआधारे तपास करण्याची नर्सिंग होमला परवानगी असते का, याचाही तपास केला जाणार आहे. महापालिका नर्सिंग होमच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहे. बायोमेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकता येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांनाही बोलावण्यात आले होते. नर्सिंग होमचे डॉक्टर, भंगार व्यावसायिक, कचरा उचलणारे हे सारे आता रडारवर आले आहेत.
पुरोहित नर्सिंग होमचे संचालक डॉ. गोकुल पुरोहित, केअर टेकर बिपीन साहू, भंगारवाला सुनील साहू या सर्वांची चौकशी करण्यात आली. डॉ. पुरोहित यांच्या पत्नी डॉ. यशोदा पुरोहित या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. त्या नंदनवनच्या एका होमिओपॅथी कॉलजशी निगडित असल्याची माहिती आहे.