विद्यापीठांनी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून गावे दत्तक घ्यावीत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नागपूर समाचार (वासुदेव पोटभरे) : नागपूर आयआयएम विद्यार्थ्यांमध्ये रोजगार दाते होण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी अनुरुप अशी परिसंस्था निर्माण करेल, असा विश्वासही राष्ट्रपती रामनाथ. कोविंद यांनी आज यावेळी व्यक्त केला.
आपण सध्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात असलो तरी देशातील एक वर्ग या तंत्रज्ञानापासून दूर आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून गावे दत्तक घ्यावीत. तसेच ‘आयआयएम’सारख्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांनी आपल्या परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता आणि डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
नागपूर मधील मिहान परिसरात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भिमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठे प्रोत्साहन लाभत असलेल्या काळात विविध युनिकॉर्न किंवा स्टार्ट-अप्सनी नवा इतिहास घडविल्याचा उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, विविध नवीन क्षेत्रे व्यावसायिकतेच्या परिघात येत चालली असून त्यातून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्वाच्या क्षेत्रात हे नविन उपक्रम सुरु झाले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीसोबतच महसूल प्राप्ती होणार असल्याने हा बदल देशासाठी निश्चितच ‘गेम चेंजर’ ठरु शकतो.असे ते म्हणाले.
नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्याची क्षमता तर आहेच पण त्यासोबतच अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या अनुषंगाने वंचितांच्या समस्या समजून घेण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेने नव्या पीढीने नेतृत्व भावना जोपासून काम करावे, असे आवाहन करुन राष्ट्रपती म्हणाले, सामाजिक उद्यमशीलता वाढत असून व्यावसायिक वर्तुळातील अनेकांनी याबाबत चांगला आदर्श घालून दिला आहे. भारतीय आदर्शवादात अर्थ हा नेहमीच धर्माचा अवलंब करुन प्राप्त केला जातो. समाजसेवी असणे हे चांगला व्यावसयिक असण्यासारखे आहे. पाश्चिमात्य जगात नव्वदोत्तर कालखंडात व्यावसायिक आणि व्यवसायांनी आपल्या क्षेत्राच्या नैतिक पैलूंवरही भर द्यायला सुरुवात केली.
आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी नागपूर आयआयएमच्या अद्ययावत आणि विविध वैशिष्ट्यांनी समाविष्ट परिसराच्या उभारणीबाबत प्रशंसोद्गार काढले.
येथील स्थानिक संस्कृती या वास्तुतून प्रतिबिंबित होत असून ही संस्था केवळ अध्ययन केंद्र न राहता जीवनदायी अनुभव देणारे केंद्र ठरावे, असे सांगून या संस्थेच्या सेंटर फॉर एक्सलन्स, नागपूर फाउंडेशन फॉर इंटरप्रूनरशिप डेव्हलपमेंट, सॅटेलाईट कॅम्पस, रिजनल इनोव्हेशन ऑर्गनायझर या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला.
आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तु शहरात निर्माण झाली असून नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असल्याचा अभिमानास्पद उल्लेख करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मेडिकल तसेच लॉजिस्टिक म्हणूनही नागपूर विकसित होत आहे. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होणार आहे. असे गडकरी यांनी सांगितले.
पाश्चिमात्यांच्या तुलनेत स्थानिक शिक्षणप्रणालीला महत्त्व देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी भारताच्या एका प्रमुख संस्थेच्या कॅम्पसचे लोकार्पण होत असल्याचा आनंद व्यक्त करून केद्रीय मंत्री धमेंद्र. प्रधान म्हणाले,.
विदर्भ विकासाच्या बाजूने पाऊल – देसाई : नागपूर आयआयएम संस्थेतून बुद्धिमान विद्यार्थी व साहसी उद्योजक निर्माण होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करताना राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडत आहे. या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली असून विविध देशातील संस्था या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळत आहे. ही संस्था नागपूरसह राज्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येणार आहे.
विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करून विरोधी पक्षनेते देवेद्र. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक दर्जाचे कौशल्ययुक्त मनुष्यबळ मिळावे, यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याची सुरुवात केली आहे. कौशल्य युक्त मनुष्यबळ निर्माण करण्याची ही प्रक्रिया असून नागपुरात उभी राहिलेली वास्तू ‘स्टेट ऑफ आर्ट दर्जाची ‘ असून नवीन भारताचे स्वप्न साकारणारी आहे, असे गौरवोद्गार काढले.
भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालन करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरुनाणी यांनी प्रास्ताविक केले. या संस्थेच्या माध्यमातून नाविन्याची, संशोधनाची जिद्दी असणारी पिढी निर्माण करण्याची आमची मोहीम असून जागतिक दर्जाचे कॅम्पस निर्माण करू शकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या सुसज्ज अशा इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर 132 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती यांना स्मृतिचिन्ह देवून स्वागत केले. संचलन समितीचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी व संचालक डॉ. भीमराय मैत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.