जमीनपट्टे वाटपासंदर्भात आढाव
नागपूर समाचार : अतिक्रमीत शासकीय जमीनी नियमाकिंत करुन लाभार्थ्यांना त्या जमीनीचे पट्टे वाटप दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना दिल्या. नागपूर येथील अतिक्रमीत शासकीय जमीनीच्या पट्टे वाटपाचा कार्यक्रम लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असल्याने या क्रामास प्राधान्य घ्या, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायत व महापालिकांच्या अंतर्गत जमीनपट्टे वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, तहसिलदार सिमा गजभिये, अर्चना मेंढे, सर्व नगर परिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, महापालिकेचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत 2017 च्या शासननिर्णयानुसार अतिक्रमीत जमिनी गावठाण करुन लाभार्थ्यांना जमीनीचे पट्टे देण्यात यावे असे नमूद असून दिवाळीपूर्वी सर्व जमीनीबाबत योग्य ती कार्यवाही करुन लाभार्थ्यांना जमीनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. वनहक्क समितीशी याबाबत चर्चा करुन त्यासोबतच जी जमीन गावठाण आहे तीचे डिसेंबरपूर्वी तत्काळ पट्टे वाटप करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
स्वामित्व योजनेंतर्गत या अतिक्रमीत जमीनीचे ड्रोनद्वारे सर्वे करण्यात यावे, त्यामुळे वेळ व पैशाची बचत होईल, असेही त्यांनी सांगितले. नागपूर महानगरात अतिक्रमण धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमीत जमीनीबाबत कार्यवाही करावी. अजून पर्यंत प्रलंबित असलेल्या जमीन पट्टयांचे सर्वे त्यासोबतच त्यानुषंगीक नियमांकुल कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
शासनाची क व ड प्रकारची जमीनीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्यामुळे त्यावर तत्काळ कार्यवाही करा. सेवा पंधरवाडा सुरु असल्याने या कामास प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.