नागपूरकरांचा ‘चिवडा स्पेशल संडे’; विष्णू मनोहरांचा अडीच हजार किलोचा ‘महा-चिवडा’
नागपूर समाचार : भव्य-दिव्य पद्धतीने विविध खाद्यपदार्थ विश्वविक्रम रचणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 14वा विक्रम आपल्या नावी केला आहे. जागतिक अन्न दिनानिमित्त (World Food Day) त्यांनी तब्बल अडीच हजार किलो कुरकुरीत ‘महा-चिवडा’ तयार करण्याचा विक्रम केला. तसेच उपक्रमस्थळी म्हणजेच बजाजनगर येथील विष्णूजी की रसोई येथे भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला गरमा-गरम महा-चिवडा दिला. त्यांच्यामुळे नागपूरकरांनी ‘चिवडा स्पेशल संडे’ अनुभवला. विष्णू मनोहर यांचा महा-चिवडा हा 14वा विक्रम असून यापूर्वी त्यांनी पराठा, कबाब, मसाले भात, खिचडी, साबुदाना उसळ, भरीत आदींचे विक्रम आपल्या नावी केले आहे.
चिवडा केवळ दिवाळीतच नाही. तर वर्षभर घरोघरी होतो. म्हणून दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विष्णू मनोहर यांनी घेऊन गोर-गरीबांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने चिवडा विक्रम करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना अनेक संस्थांची साथही मिळाली. यावेळी तयार करण्यात आलेला चिवडा हा येणाऱ्या नागरिकांना तर दिलाच, यासोबतच विविध संस्थांच्या माध्यमातून नागपूर शहरातील विविध भागात वितरण करण्यात येणार आहे. यासह गडचिरोली येथील काही संस्थांच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे.
याठिकाणी भेट देणाऱ्या विष्णू मनोहर यांच्या फॅन्सकडून त्यांना निरनिराळ्या भेट वस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येत होते. सुहास कोथळकर यांनी विष्णू मनोहर यांच्या आतापर्यंतच्या सर्व 13 विश्वविक्रमांचे छायाचित्र असलेला अनोखा केक याठिकाणी सादर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनीही यावेळी त्यांच्यासोबत सेल्फीकाढून आपल्या सोशल मीडियावर उपक्रमाबद्दल लिहीले. नागपूरचे शेफ जागतिक स्तरावर विक्रम करत असल्याने आपल्याचा आपल्याला अभिमान असल्याची भावनाही बोलून दाखविली. या उपक्रमाला कांचन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे, माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन विष्णू मनोहर यांचे अभिनंदन केले.
‘महा-चिवडा’साठी लागलेले साहित्य : तब्बल अडीच हजार किलो चिवड्यासाठी साहित्याही मोठ्या प्रमाणावर लागले. त्यासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून 600 किलो चिवडा आणली होती. यासोबतच शेंगदाणा तेल 350 किलो, शेंगदाणे 100 किलो, काजू व किसमिस 100 किलो, डाळ व खोबरे प्रत्येकी 50 किलो, हिंग व जिरे पावडर प्रत्येकी 15 किलो, मिर्ची पावडर 40 किलो, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी 100 किलो, वाळलेले कांदे 50 किलो, धने पावडर 40 किलो असं साहित्य या चिवड्यासाठी लागलं आहे. याची पूर्व तयारी एक दिवसाआधीपासून म्हणजेच शनिवारपासून केली होती. तसेच रविवारी सकाळी 9 पासून उपक्रमाला सुरुवात झाली.
सहा हजार किलोची भव्य कढई : सहा हजार किलोची एक भव्य कढई आणि तीन हजार किलोची दुसरी कढईच्या मदतीने चिवड्याची तयारी करण्यात आली. हा चिवडा तयार होत असताना येणाऱ्या नागरिकांना गरमा गरम चिवडा थेट कढईतून काढून देण्यात येत होता.
विष्णूंनी मोडला होता स्वतःचाच विक्रम : गणेशोत्सवा निमित्त नुकतेच विष्णू मनोहर यांनी नागपुरातच 2500 किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण केले होते. चिवड्याचा हा विक्रम मनोहर यांचा 14 वा विश्व विक्रम राहाणार आहे. सलग 53 तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. 5 फूट लांब आणि 5 फूट रुंद असा ‘सर्वात लांब पराठा’ तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात 7000 किलोची ‘महा मिसळ’ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी भारतात 3200 किलो वांग्याचे भरीत तयार करून जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी 3000 किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर 5000 किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला होता.