अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधातील राष्ट्रीय बैठकीत फडणवीस यांचा सहभाग
नागपूर समाचार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत बुधवारी झालेल्या एका उच्चस्तरिय बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरहून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ असा या परिषदेचा विषय होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल गांधीनगरमध्ये ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील एका उच्चस्तरीय पश्चिम विभागीय प्रादेशिक बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. विविध राज्यांचे गृहमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात गृहमंत्रालयाने मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात अतिशय कठोर पाऊले उचलली आहेत. अल्पावधीतच त्याचे अतिशय चांगले परिणाम दिसून येत आहेत.
भारताला ड्रग्जमुक्त करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश एकजुटीने काम करीत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालावधी सध्या सुरू असल्याने 75 दिवसांत 75 हजार किलो मादक द्रव्य नष्ट करण्याचे अभियान हाती घेण्यात आले होते. मात्र आतापर्यंत त्यापेक्षा अधिक म्हणजे 1.65 लाख किलो मादक पदार्थ नष्ट करण्यात आले, अशी माहिती देतानाच सर्वच यंत्रणांनी या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी अमित शाह यांनी केले.
नागपुरातून या बैठकीत सहभागी होताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थ विरोधी तस्करीशी लढा देताना पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानाचे अद्यावतीकरण, व्यसनमुक्ती, जनजागरण, आंतरराज्यीय समन्वय आणि नव्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा केली. अंमली पदार्थ तस्करीचा बिमोड करताना सर्व यंत्रणांचा उत्तम समन्वय ठेवण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. या बैठकीला नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्र्यांसोबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.