‘नियतीचा खेळ’ चे कथानक हृदयद्रावक – अरुणा पुरोहित
नागपूर समाचार : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र देशपांडे यांच्या ‘नियतीचा खेळ’ या बांगलादेश निर्मितीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित लघुकादंबरीचे कथानक अतिशय हृदयद्रावक व अंत:स्पर्शी असून ही कादंबरी खिळवून ठेवणारी आहे, असे मत उद्योजिका व सामाजिक कार्यकर्ती अरुणा पुरोहित यांनी व्यक्त केले.
स्क्वेअर मीडिया पब्लिशर्सद्वारे शॅलेज रेस्ट्रॉ येथे ‘नियतीचा खेळ’ कादंबरीचा सोमवारी प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. उद्योजिका व सामाजिक कार्यकर्ती अरुणा पुरोहित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. स्क्वेअर मीडिया पब्लिशर्स, नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालिका मंजुषा जोशी, संचालिका हेमांगी केणेकर तसेच, वृंदा देशपांडे, श्रीकांत व अंजली देशपांडे व इतर मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.
भालचंद्र देशपांडे यांचे अनेक कौटुंबिक, विनोदी, रहस्य, बाल, विज्ञान, शैक्षणिक कथा व लेख विविध दिवाळी अंक व नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर त्यांनी अनेक नभोनाट्ये प्रसारित झाली आहेत. ही लघुकादंबरी चंद्रकांत या दिवाळी अंकात याआधीच प्रकाशित झाली असून डॉ. उषा गडकरी यांची प्रस्तावना लाभलेली आहे. कादंबरीबद्दल भालचंद्र देशपांडे मनोगत व्यक्त केले.