अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार : देवेंद्र फडणवीस
नागपुर समाचार : अंभोरा पर्यटन स्थळासाठी नियामक मंडळाची मान्यता घेऊन २०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. ७८२ कोटीच्या नागपूर -उमरेड चार पदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नागपूर -उमरेड चार पदरी रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय राजमार्ग असणाऱ्या नागपूर -उमरेड ३५३ डी चौपदरीकरण मार्गाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, जि.प. च्या अध्यक्षा मुक्ता विष्णू कोकडे, आमदार प्रवीण दटके,मोहन मते,राजू पारवे,यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
७८२ कोटी खर्चाच्या जागतिक दर्जाच्या या चार पदरी रस्त्याची लांबी ४१ किलोमिटर आहे. ३ वर्षात हा रस्ता पूर्ण करण्यात आला. या रस्त्यामुळे नागपूर महानगराशी उमरेड व परिसर सुलभ,गतीशील व सुरक्षित मार्गाने जोडल्या गेले आहे. हा महामार्ग उभारताना मांगली, हळदगाव, बेलगाव, उकडवाही, वडेगाव, पांढराबोडी या अस्तित्वात असणाऱ्या सहा तलावाचे खोलीकरणही करण्यात आले. १०० किमी प्रती तास वेगाचा हा महामार्ग असून पोहरा व आम नदीवरील दोन मोठया पुलाचा यामध्ये सहभाग आहे.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने अतिशय चांगला रस्ता जनतेला मिळाला असल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. नागपूर ते मूल हा प्रवास करताना गेल्या 40 वर्षापासून या रस्त्यासोबत आपला संबंध आला आहे. त्यामुळे या रस्त्यामध्ये झालेले दर्जेदार बदल लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भाचा मोठ्या प्रमाणात विकास होत असून नागपूरच्या आजूबाजूला झालेल्या विकास कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक हब’,तयार होत आहे. समृद्धी मार्ग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर दोन अडीच वर्षातच लॉजिस्टिक कंपन्यांना जमीन देखील मिळणार नाही. इतक्या झपाट्याने या ठिकाणी विकास होईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल उद्योजकता वाढेल.
यावेळी त्यांनी ब्रॉडगेज रेल्वे प्रस्तावामध्ये वनविभागाचा आलेला अडथळा दूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. अंबोरा येथे पर्यटन विकासाच्या सर्व कल्पना साकार होतील. यासाठी लवकरच राज्याच्या नियामक मंडळाकडून 200 कोटीची मान्यता घेतली जाईल. या परिसरात पर्यटन सर्किट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन क्षेत्र तयार करण्यासाठी राज्य सरकार निश्चित मदत करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या मागणीचा उल्लेख करून त्यांनी आज घोषणा न करता या संदर्भात येत्या काही दिवसात प्रत्यक्ष मी केलेली कारवाई दिसून पडेल,असे सांगितले. यापूर्वी राज्याचे नेतृत्व करताना सुद्धा शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न आपण सोडवला होता. यावेळी देखील यामध्ये लक्ष घालू असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी या रस्त्याचा शुभारंभ करताना आनंद होत असल्याचे सांगितले. सोबतच येणाऱ्या काळामध्ये कुही ते उमरेड 200 कोटींचा, उमरेड ते भिवापूर चार पदरी 51 कोटींचा तर उमरेड ते बोटीबोरी वीस कोटींचा रस्ता करण्यात येईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा आज केल्या.
‘टायगर कॅपिटल ‘, होत असलेल्या नागपूरकडे जागतिक पर्यटक आकर्षित होत आहे. या पर्यटकांना साजेसे पर्यटन केंद्र अंबोरा येथे केले जाईल. गोसेखुर्द प्रकल्पाचा जल पर्यटनासाठी कल्पकतेने वापर केला जाईल. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार या भागातील युवकांना मिळेल असे, त्यांनी सांगितले. अंभोरा येथे होणारा जो पूल आहे तो केवळ दोन जिल्हे जोडणार नाही तर जागतिक दर्जाच्या पर्यटनाला या भागाशी जोडेल, असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी, आमदार राजू पारवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर तर आभार प्रदर्शन प्रशांत खोडस्कर यांनी केले.