बोगस डॅाक्टर आढळल्यास संबंधितांना कळवा जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन
नागपूर समाचार : कोणत्याही नागरिकाला आपल्या जवळपास बोगस डॅाक्टर आढळल्यास तत्काळ संबंधितांना कळवावे. जेणेकरून नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करण्यात येईल. यासाठी संबंधितांचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांना कळविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर यांनी आज आयोजित बैठकीत दिले.
बोगस वैद्यकीय व्यावसायींवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, गृह विभागाचे उपअधीक्षक तसेच आपल्या स्वतःचाही दूरध्वनी क्रमांक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा. जेणेकरून ते थेट संपर्क साधतील व बोगस डॅाक्टर आढळल्यास कारवाई करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
आजच्या बैठकीत गेल्यावेळी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली. जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या तीन महिन्यातून एकदा नियमितपणे बैठका घेण्यात याव्यात. भारतीय वैद्यक परिषद (आयएमए), बालरोगतज्ज्ञ, त्वचाविकारतज्ज्ञ यांचाही या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. एम.सी. थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. डी.एस. सेलोकार, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, अन्न व औषधी द्रव विभागाचे महेश गाडेकर,आरोग्य विभागाचे डॅा.साईनाथ भोवरे, डॅा. अनिल पावशेकर आदी उपस्थित होते.