हाऊसफुल्ल गर्दीत खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा तिसरा दिवस गाजला
नागपूर समाचार : सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे गायक, वादक, संगीतकार, गीतकार अमीत त्रिवेदी यांच्या ‘रॉकिंग परफॉर्मन्स’ वर तरुणाई चांगलीच थिरकली. तरुणाईच हाऊसफुल्ल गर्दी, युवतींच्या ‘आय लव्ह यु अमीत’ च्या गर्जना आणि टाळ्यांनी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा तिसरा दिवस चांगलाच गाजला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या तिस-या दिवसाची सुरुवात ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रमाने झाली. श्याम देशपांडे यांच्या नेतृत्वातील गटाने हा कार्यक्रम सादर केला. सूर संगम ताल संगम, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है अशी गाणी त्यांनी सादर केली. त्यानंतर अमीत त्रिवेदी यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’चा नागपूरकरांनी आनंद घेतला.
अमीत त्रिवेदी यांनी ‘नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा’ या गाण्यासह मंचावर आगमन केले. तरुणाईने त्यांची छबी कॅमेरात टिपून घेण्यासाठी मोबाईल सरसावले. ‘रुठे ख्वाबों को मना लेंगे’, ‘नैना दा क्या कसूर’ अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी सादर केली. खासदार सांस्कृतिक महोत्सवात मला आमंत्रित केल्याबद्दल मी नितीन गडकरी यांचा आभारी आहे. असे महोत्सव देशातील प्रत्येक शहरात आयोजित केले जावे, अशी इच्छा अमीत त्रिवेदी यांनी यावेळी व्यक्त केली.
‘मीट माय फ्रेंड्स’ सेगमेंटमध्ये अरुण कामत यांनी ‘ये फितुर मेरा’, यशिता शर्माने ‘मै परेशान’, मेघना मिश्राने ‘लव्ह यू जिंदगी’ तर देवेंद्र पाल सिंगने ‘एक कुडी’ ही गाणी सादर केली तर ‘प्यार का सफर’, ‘प्यार में सफर’ अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये गायकांनी प्रेमगीतांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूर मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर ब्रिजेश दीक्षित, योगेश कुंभेजकर, सौम्या शर्मा, अनिल कोकाटे, अॅड. आनंद परचुरे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, मिकी अरोरा, नितीन मारिया यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.
नितीन गडकरींच्या प्रेमात उजळले दिवे : रस्ते, आरोग्य, शिक्षण, कृषी, धार्मिक, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण अशा सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणा-या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेमाखातर ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या तरुणाईने व नागरिकांनी मोबाईलचे दिवे उजळून अभिवादन केले. नितीन गडकरी यांनी नागपूरकरांच्या शुभेच्छांमुळेच स्थानिक पाच हजार कलाकारांना आपली कला या मंचावर सादर करता आली असे सांगितले. या सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूरकरांचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढणार असून त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.