“अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये”; संतांची शिकवण कायम प्रासंगिक
नागपूर समाचार : प्रत्येक वस्तुचा गुणधर्म असतो आणि त्याच प्रमाणे त्याचे कार्य असते.तुकाराम महाराज अभंगात म्हणतात “अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये.” अर्थात अग्नि ही थंडी पासून बचाव करण्यास मदत करते हे अग्नीचे सौजन्य असले तरीही तिला खिशात बांधून नेणे शक्य नाही. म्हणजेच प्रत्येक वस्तु आणि व्यक्ती मधील चांगल्या गुणधर्मांना तेवढे आचरणात आणावे. त्याच प्रमाणे कुठल्याची गोष्टीची अति जवळीक ही घातक असते हे देखील या अभंगाच्या ओवीतून लक्षात येते असे परमपूज्य सद्गुरूदास महाराज म्हणाले.
श्री गुरुमंदिर जयप्रकाशनर येथे दत्त जयंती सप्ताह निमित्त 30 नोवेंबर ते 8 डिसेंबर पर्यन्त विविध आध्यात्मिक कार्यक्रम, निरूपण, प्रवचन, कीर्तन इत्यादींचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत समरोपीय अभंग निरूपण परमपूज्य सद्गुरूदास महाराज यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे महाराजांनी गोष्टी आणि उदाहरणे देऊन अभंगाच्या ओव्यांचे निरूपण केले. सर्प किंवा विंचू हे त्यांच्या सोबत चांगले वागले म्हणून दंश करणे किंवा डंख मारणे सोडत नाही. त्यामुळे अश्या गुणधर्म असलेल्या व्यक्ती आणि प्राणी यांच्यासोबत किती जवळीक असावी हे समजणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
संत जे संतवणीतून सांगतात हे कायम प्रसंगीक आहे असे सांगताना ते म्हणाले की जसे समर्थांनी प्रत्येकाला सज्जन म्हणून बघण्यास तर ज्ञानेश्वर माऊलींनी दुर्गुणी किंवा खलवृत्तीचे दोष निवारण्यास म्हंटले आहे. हे आजही प्रासंगिक असून त्यातून मिळालेली शिकवण आपल्याला सन्मार्ग दाखविते असे ते म्हणाले.
तत्पूर्वी मार्गशीर्ष शु.पौर्णिमा श्री दत्त जन्म तिथि निमित्त श्री गुरु मंदिरातून सकाळी ठीक ६ वाजता श्री दत्तात्रेय देवता व श्री गुरु चरित्राची पालखी निघाली. टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या पालखीचे जयप्रकाश नगर, गोविंद नगर, तपोवन येथे घरोघरी औक्षण पूजन झाले. श्रीगजानन, श्री महालक्ष्मी, श्रीराम मंदिरात पालखीचे आगमन होऊन पूजन केले.
दत्त भजन, गजराने संपूर्ण नगर दुमदुमून गेले. यावेळी ४००च्या वर दत्त भक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले. त्यानंतर ठीक ११.३० वाजता अवतरणिका व दत्त जन्माच्या अध्यायाचे प.पू. सद्गुरू दास महाराज यांच्या गुरूवाणीतून वाचन होऊन दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात, आनंदात फटाक्यांच्या गजरात संपन्न झाला. या कार्यक्रमात शेकडो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
संध्याकाळी ५.३० वाजता चि. अमोघ अमर देशपांडे यांचे दत्तजन्मवर कीर्तन झाले. स्पष्ट उच्चार, खडा आवाज, पाठांतर व कीर्तन परंपरे नुसार त्यानी कीर्तन सादर केले व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या दिवसभराच्या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.