‘भावविश्व दिव्यांगांचे’ सांगीतिक चर्चात्मक कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
नागपूर समाचार : दिव्यांग व्यक्तींच्या विशेष गरजांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज असते. विशेषकरून दिव्यांग मुलांना संस्कारित करताना पालकांनी संयम आणि समजदारी या दोन्ही बाबींचे महत्व समजून ते अमलात आणले पाहिजे असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगांवकर यांनी दिला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद नागपूर आणि दिव्यांगांसाठी कार्यरत सेवाभावी संस्था यांच्या सौजन्याने आणि ऋतुराज प्रस्तुत ‘भावविश्व दिव्यांगांचे’ हा सांगीतिक चर्चात्मक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी येथेआयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर व माजी आमदार महाराष्ट्र राज्य प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर,किशोर भोयर उपस्थित होते.
मुलांना संस्कारित करताना आजूबाजूच्या परिस्थिति सोबत जुळवून घेणे, समाजात वावरताना लागणरे संवाद कौशल्य, स्वच्छता हे शिकवत असताना पालकांनी धाक आणि प्रेम याचा योग्य ताळमेळ साधावा असे डॉ. शैलेश पानगांवकर यांनी सांगितले. शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांच्या समस्या, किशोर वयातील पदार्पण, आत्मनिर्भरता,पालक / कुटुंबियांना समुपदेशन अश्या विविध विषयांवर यावेळी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
या आगळ्यावेगळ्या सांगीतिक चर्चात्मक कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची आहे. या वेळी सहभागी संस्थांच्या कार्यांची माहिती देणारे लघुपट दाखविण्यात आले. कार्यक्रमात गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य – अय्यर, मुकुल पांडे यांनी चर्चेला अनुसरून वेगवेगळी गीते सादर केली. यामध्ये विठ्ठला तू वेडा कुंभार, रांगतो रांगतो, जिंदगी कैसी ये पहेली, तारे जमीन पर, जब कोई बात बिघड जाये, वो तो है अलबेला, आज मै उपर आसमा नीचे, हमने देखी है, हारी बाजी को जीतना, नाही पुण्याची मोजणी ही गीते सादर केली. शेवटी ‘हम होंगे कामयाब’ हे गीत सगळ्यांनी म्हंटले. सांगीतिक कार्यक्रमाला परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र, मुग्धा तापस या वादक मंडळीने साथसंगत केली. किशोर गलांडे यांनी कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्र संचालन केले.
तत्पूर्वी माजी महापौर अनिल सोले यांनी या उपक्रमाबद्दल सर्व संस्थाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील उपक्रमांसाठी मदतीची ग्वाही दिली. डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग यांनी शासन स्तरावरील दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना याबद्दल माहिती दिली आणि या क्षेत्रात आणखी काम होण्याची गरज बोलून दाखविली. यावेळी समाज कल्याण विभागातर्फे अभिजीत राऊत, यांचा तर अनिल सोले यांच्या हस्ते डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांचा त्यांच्या विशेष योगदानासाठी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशादीप संस्थेच्या प्रतिमा शास्त्री यांनी तर सूत्रसंचालन विकास खळतकर यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. राऊत यांनी केले. यावेळी सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदे, अभिजीत राऊत यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सक्षम संस्थेतर्फे 3 मुलांना कर्णयंत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर, समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम, स्वीकार, आशादीप, इंद्रधनु, माईंड पार्क फाउंडेशन, निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, श्रीकृष्ण निकेतन आणि संज्ञा संवर्धन संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.