सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक
नागपुर समाचार : कोरोनासारख्या महामारीमध्ये जितके मृत्यू झाले नसेल तितके मृत्यू रस्त्यांवर सामान्य माणसांचे होतात. जगातल्या अन्य प्रगत राष्ट्रांपेक्षाही अधिक मृत्यू भारतात होतात. त्यामुळे सर्व सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्याची मानसिकता तयार करा. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवरील अपघातात मृत्यू दर कमी करा, अशा सूचना रस्ते अपघातावरील सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा समितीचे सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) अभय सप्रे यांनी आज येथे केल्या.
रस्ते अपघातातील मृत्यू दर कमी करण्यासाठी न्यायमूर्ती (निवृत्त)अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज रस्ता सुरक्षा समितीची हॉटेल रेडिसन ब्लू नागपूर येथे बैठक झाली. या बैठकीला ते मार्गदर्शन करीत होते.
या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. पूजा सिंग, वाहतूक विभागाच्या उपायुक्त चेतना तिडके, आदींसह जन आक्रोश या रस्ते सुरक्षा संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसह अनेक विशेष आमंत्रित सहभागी झाले होते.
या सर्व संस्थांची मते न्यायमूर्ती सप्रे यांनी जाणून घेतली. नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते अपघाताचे प्रमाण असून 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत 399 लोकांचा मृत्यू रस्त्यावरील अपघातात झाला आहे. ही संख्या सतत वाढत असून जिल्ह्यातील अपघाताचे व त्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्ट न वापरणे, अनियंत्रित गतीत वाहन चालवणे या तीन कारणांमुळे बहुतेक मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांना प्राथमिक स्तरावरच रस्ते सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून त्यांनी शालेय स्तरावर या संदर्भात विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याबाबत सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले. हेल्मेट शिवाय कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. हेल्मेट सारखी वस्तू विसरणे, सीट बेल्ट न लावणे, हे मृत्यू ओढून घेण्यासारखे आहे.बीपी, शुगर असणारे पेशंट कधी आपल्या गोळ्या विसरत नाही. कारण आरोग्याची खेळ होतो. तसेच हातात गाडी घेतल्यानंतर हेल्मेट न वापरणे सीट बेल्ट न लावणे म्हणजे मृत्यू ओढून घेणे होय हे लक्षात घेतले पाहिजे. समाजाची या संदर्भातील मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित सर्व विभाग प्रमुखांना तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मते त्यांनी जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील अपघातातील मृत्यू दर कमी झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
विदेशात भारतापेक्षा गतिशील वाहनरस्ते आहेत. मात्र अपघात झाल्यानंतर त्यामध्ये मृत्युमुखी पडणे याचे प्रमाण कमी आहे. जापान सारख्या प्रगत देशात चार लाख अपघातात 4 हजार मृत्यू होतात. तर भारतात 4 लाख अपघात झाल्यानंतर एक लाख लोकांचा बळी जातो.सुरक्षा मानकांचा वापर न करणे सुरक्षा नियम न पाळणे हे यामागील प्रमुख कारण असून ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. भारतात महाराष्ट्र अपघाती मृत्यूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना काळात महामारीने जितके नागरिक मृत्युमुखी पडत नसतील तितके नागरिक रस्त्यावर मृत्युमुखी पडत असून यावर नियंत्रण आणावे. पुढच्या आढाव्यात जिल्हयातील अपघात प्रवण स्थळे व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.