गोवर रुबेला लसीकरणास विशेष प्राधान्य द्या
नागपुर समाचार : जिल्ह्यात गोवर रुबेला विशेष लसीकरणाच्या मोहीमेची पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. तर दुसरी फेरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहीमेला आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.
गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीमेची आढावा बैठक आज जिल्हाधिका-यांचा अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोवर रुबेलाचा राज्यातील काही भागात प्रादूर्भाव पहायला मिळत आहे. हा धोका ओळखून जिल्ह्यात गोवर रुबेलाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गोवर, रुबेलाचे लसीकरण न झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे. आरोग्य यंत्रणेला सर्वसामान्यांचे सहकार्य या मोहीमेसाठी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी बैठकीदम्यान म्हणाले.