- Breaking News

नागपुर समाचार : २२ ते २६ डिसेंबर दरम्यान 4 थे ग्रामायण सेवा प्रदर्शन २०२२

वैविध्यपूर्ण स्टॉलस्, कार्यशाळा, स्पर्धा, खाद्य पदार्थाची मेजवानी 

नागपूर समाचार : ग्रामायण प्रतिष्ठानच्‍यावतीने व नागपूर महानगर पालिका आणि पश्चिम नागपूर नागरीक संघ यांच्या सहकार्याने 4 थे ग्रामायण सेवा प्रदर्शन 22 ते 26 डिसेंबर दरम्‍यान सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात आले आहे. रामनगर येथील मैदानावर होणा-या या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण स्टॉलस्, कार्यशाळा, स्पर्धा, खाद्य पदार्थाची मेजवानी मिळणार असल्‍याची माहिती ग्रामायण प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अनिल सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चोखंदळ ग्राहक आणि भक्कम विक्री हे ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य असून यंदाच्‍या प्रदर्शनाची मध्‍यवर्ती संकल्‍पना पोषण, आरोग्य आणि पर्यावरण यावर आधारित आहे. यावेळी प्रथमच हे प्रदर्शन पूर्ण ५ दिवसांचे आहे. प्रदर्शनादरम्यान जुगाडू इंजिनियर्स स्पर्धा, सक्रिय महिला मंडळ स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक समाज योद्धा स्पर्धा, आठवणीतील मिलेट्स अशा विविध स्‍पर्धा घेतल्‍या जाणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व प्रकारचे वेस्ट कलेक्शन करण्यात येणार आहे. सुमारे १५ ते २० हजार स्त्री-पुरुष प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आहे. 

ग्रामीण उत्पादक, महिला, लघु उद्योजक, कारागीर, व्यावसायिक, शेतकरी, बचत गट, स्टार्टअप युवा, एनजीओ सहभागी संस्था पश्चिम नागपूर नागरिक संस्था, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, पतंजली योग समिती नागपूर व अनेक संस्था सहभागी यात सहभागी होणार असून विधानसभा अधिवेशन काळात नागपुरात असलेले आमदार, खासदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी त्याशिवाय अभिजात वर्ग, कलाकार, शास्त्रज्ञ, विविध संस्था, संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेंट देणार आहेत. 

ग्रामायण प्रदर्शन परिसराला ज्येष्ठ कृषी उद्योजक बळवंत मोतीराम उर्फ स्व. बालुअण्णा उमाळकर यांचे नाव देण्यात येणार असून प्रवेशद्वाराला जागतिक कीर्तीचे थोर कृषी संशोधक स्व. डॉ. पांडुरंग खानखोजे यांचे नाव देण्यात येणार आहे. कार्यक्रम व्यासपीठाला सेंद्रीय शेतीचे अभ्यासक, पुरस्कर्ते व प्रयोगशील शेतकरी स्व. मनोहसराय परचुरे यांचे नाव देण्यात येणार आहे.

मित्र व परिवारासह आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ग्रामायण प्रतिष्‍ठानचे सचिव संजय सराफ, प. ना. नागरीक संघाचे अध्‍यक्ष रवी वाघमारे व सचिव राजीव काळेले यांनी केले आहे.

भरगच्‍च कार्यक्रम : पोषण, आरोग्य, पर्यावरण संबंधी माहिती, साहित्य मार्गदर्शन व चर्चा, ई-सेवा केंद्र, आरोग्य तपासणी व रक्‍तदान शिबिर, सेंद्रिय पदार्थांचे स्टॉल, विविध स्पर्धा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम, कृषी, उद्योग सेवा/एनजीओ क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वाचा सत्कार, ज्‍येष्‍ठांचे समाज योद्धा समेलन, महिला नेतृत्व संमेलन, ई-वेस्ट प्लास्टिक वेस्ट, भंगार, जुने कपडे, पुस्तकें, रदी इत्यादी वस्तू संकलनासाठी स्‍टॉल्‍स, अंध, मूकबधिर, गतिमंद आणि भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्‍यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्‍च आयोजन राहणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *