ओंकार रहाटे ‘ऑन द स्पॉट पेंटींग’ स्पर्धेचा विजेता
नागपूर समाचार : कलेची भाषा ही भिन्न असते. त्यात ताजेपणा असतो. कलाकाराला भरपूर वाचन, चिंतन, मनन आणि सरावही करावा लागतो. अनुभवातून त्यांची कला परिपक्व होत जाते, असे मत प्रसिद्ध चित्रकार बिजोय बिस्वाल यांनी व्यक्त केले.
एस.के. बाकरे मेमोरीयल सोसायटी व धरमपेठ शिक्षण संस्थेच्या नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थोर चित्रकार एस. के. बाकरे यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘ऑन द स्पॉट पेटींग स्पर्धा 2022’ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा रविवारी नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर येथे पार पडली. या स्पर्धेत नागपूरसह नवरगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा विविध ठिकाणाहून 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रकार बिजोय बिस्वाल यांच्यासह चेन्नईचे चित्रकार राजू दुरशेटीवार, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास व एस. के. बाकरे मेमोरीयल सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लिंबेकर व कोषाध्यक्ष सुरेश व्यवहारे यांची उपस्थिती होती.
जे. के. अकादमी आर्ट अँड डिझाईन मुंबईचे ओंकार रहाटे यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिस्फा नागपूरचे विजय कुमरे यांनी द्वितीय तर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सचिन बन्ने याने तृतीय क्रमांक पटकावला. जे.के. अकादमीचे सूर्या तेवर, ज्ञानेश्वर चित्रकला महाविद्यालय नवरगावचे कृणाल हर्षे, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे हिमांशू देवांगण व शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूरच्या रितू बचाले यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून एस.एम. बाकरे मेमोरीयल सोसायटीतर्फे मिलिंद लिंबेकर यांनी स्कॉलरशिपची घोषणा केली. यंदा त्यासाठी वैभव फरकुंडे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिंबेकर यांनी केले. डॉ. रवींद्र हरिदास यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सदानंद चौधरी यांनी केले.