सत्ता पक्षाची भूमिका लोकशाही संपविण्याची
नागपूर समाचार : नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. कालचा दिवस चांगलाच वादळी ठरला. दिशा सालियान प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. याच मुद्द्यावर बोलत असताना जंयत पाटील यांनी असंसदीय शद्बाचा उपयोग केल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलं. जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील आमदारांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं तर दुसरीकडे मविआच्या बैठकीमध्ये आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर मविआने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सत्ता पक्षाची भूमिका लोकशाही संपविण्याची आहे, आमची बाजू सत्यमेव जयते आहे तर त्यांची बाजू सत्तामेव जयते अशी आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केला तो रेकॉर्डवर येणार नाही यासाठी प्रयत्न केला जातोय. राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर विरोधकांना बोलू दिलं जात नाही. आज जागतिक शेतकरी दिवस आहे, परंतु राज्यात अतिवृष्टी झाली असताना अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. कर्नाटक वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना हा वाद वाढवण्यात येत असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आज अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधकांकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांकडून सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मविआच्या आमदारांनी हाताला काळी फीत बांधून सरकारचा निषेध केला आहे. तसेच ‘कुंभकरणाने घेतलं झोपेचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतय बोंब ‘अशा आशयाचे फलक देखील विरोधी पक्षातील आमदारांच्या हातात दिसून येत आहेत.