बैठकीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आलेले होते
नागपुर समाचार : वाल्मिकी समाज शासनाच्या योजनेपासून आजही वंचीत आहेत. शासनाच्या योजना आजही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना उद्योजक बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारवनरे यानी इंडस्ट्री डेव्हलपमेंट अॅकेडेमिक सेक्टरच्या प्रतिनिधी बैठकीत सांगितले.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचीत वाल्मिकी, मेहतर, चर्मकार समाजातील लोकांना उद्योजक कसे करता येईल, यासाठी डिक्की संस्थेसमवेत इंडस्ट्री डेव्हलपमेंट ॲकेडेमिक सेक्टरचे प्रतिनिधीच्या बैठकीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आलेले होते. बैठकीस समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते.
या समाजातील लोकांना उद्यमी कसे करता येईल व त्यांच्यात समन्वय कसा साधता येईल यावर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वाचा आयुक्तांनी परीचय करून घेतला व त्यांनी केलेल्या त्याच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. या बैठकीत महिला देखील उपस्थित होत्या. समाजाची प्रगती पाहायची असेल तर महिलाची प्रगती काय आहे यावरून दिसून येते असे यावेळी आयुक्तांनी उपस्थित महिलांच्या कार्याबद्दल म्हटले.
वंचित असलेल्या या समाजापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचविणे व त्यांचा स्तर उंचावणे यांच्याकरीता योग्य ते कार्य करणार व सर्व महामंडळाकडून मदत घेऊन सर्वसामन्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, याबाबत आराखडा तयार करणार असेही आयुक्तांनी सांगितले.
बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षण देवून वाल्मिकी समाज, बुरड, चर्मकार समाजांचे युवा गट तयार करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करून सफाई कामगारांच्या प्रश्नावर त्याच्या अडचणी, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल. बार्टीच्या संशोधन व प्रशिक्षण विभागाद्वारे त्यांच्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे (बार्टी) महासंचालक, धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी कशा प्रकारे कार्य करावे, याबाबत मार्गदर्शन करून योग्य उदाहरणे देवून उपस्थितांना समाजावून सांगितले. सफाई कर्मचारी ते यशस्वी उद्योजक तयार करावे हाच मुख्य उद्देश या बैठकीमागचा असल्याचे आयुक्तांनी सांगितले.