नवनीत राणा यांचा राऊतांवर हल्लाबोल
नागपूर समाचार : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नागपूर येथील अधिवेशनात आम्ही बरेच बॉम्ब फोडणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्रात फिरून तुमची झोप उडवणार; कारण तुमच्या पापाचा घडा भरला आहे. मी ज्या कोठडीत होतो, त्यात तुम्हालाही टाकणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. यानंतर आता संजय राऊतांना राजकीय वर्तुळातून लक्ष्य केले जात आहे. अशातच आता यावरून खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, राऊत हे कोणता बॉम्ब फोडणार, यात विदर्भातील लोकांना रस नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. अडीच वर्षांत एकाही प्रकल्पाचे उद्घाटन केल्याचे उद्धव ठाकरेंना आठवत नसेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनतेला विकासकामे हवी आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी विधानसभा नाही. विधानसभेच्या प्रत्येक मिनिटासाठी महाराष्ट्रातील नागरिक पैसे भरतात. त्यामुळे विधानसभेत जनतेच्या प्रश्नांबद्दल बोलले पाहिजे, असे आवाहन नवनीत राणा यांनी केले आहे.
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, अडीच वर्षांत काय कामे केली, याची दहा नावे त्यांनी सांगावी; परंतु काम करताना प्रत्येक व्यक्तीकडून चूक होते. जर, ते बाहेर काढण्यास सुरुवात केली तर, यांना जड जाईल. देवेंद्र फडणवीसांनी लवंगी फोडली तर भारी पडेल. मात्र, देवेंद्र फडणवीसांना फटाके फोडण्यात रस नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पक्षातील ४० आमदार भाजपबरोबर गेले आहेत. हा बॉम्ब आधीच फुटला आहे. आता जो बॉम्ब फुटेल कदाचित आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील. देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर संजय राऊतांना कुठे पळायचे आणि कुठे लपायचे हे सुचणार नाही. त्यामुळे बॉम्ब फोडण्याची भाषा त्यांनी विदर्भ आणि नागपूरमध्ये करू नये, असे आमदार रवी राणांनी म्हटले आहे.